कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : पालकमंत्री सतेज पाटील यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड
सतेज औंधकर, कोल्हापूर | विधान परिषद निवडणुकीत कोल्हापुरात सतेज पाटील (Satej Patil) विरुद्ध अमल महाडिक यांच्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजप-महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद जागांबाबत बिनविरोधचा फॉर्म्युला ठरल्यामुळे राज्यामधील विधानपरिषद निवडणुका बिनविरोध झाल्या. आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला. या निवडणुकीत राज्याचे लक्ष लागून राहिलेली 'हाय व्होल्टेज' समजली जाणारी 'पाटील-महाडिक' लढत बिनविरोध झाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यामध्ये जल्लोष सुरु झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्वच जागा बिनविरोध करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. भाजप- महाविकास आघाडीमध्ये याबाबतचा समझोता एक्स्प्रेस चालू होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली होती. त्यांच्या पाठोपाठ आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार या निर्णयाला बळ आले होते. त्याप्रमाणे, आज राज्यातील सर्व विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक म्हटली की 'पाटील-महाडिक' यांची लढत डोळ्यासमोर येते. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व माजी आ. अमल महाडिक यांच्यात इर्ष्येची लढाई होणार होती. गेल्या वेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव करून विधानपरिषदेत एंट्री केली होती. कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वर्चस्वासाठी पाटील आणि महाडिक यांच्यात लढतीमुळे राजकीय वातावरण तापले होते. पण भाजप-महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद जागांबाबत बिनविरोधचा फॉर्म्युला ठरल्यामुळे अर्ज माघारीसाठी कोल्हापुरातील महाडिक कुटुंबाला भाजपने दिल्लीहून फोन केला. त्याप्रमाणे अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड झाली.यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.