Maratha Reservation | खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपतींच्या भेटीला; शिष्टमंडळात ‘या’ मंत्र्यांचा समावेश
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एकीकडे मराठा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला असताना, दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ असणार आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप नेत्यांचा समावेश आहे.
संभाजीराजे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांना आपले प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राजकीय पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले प्रतिनिधी पाठवले आहेत. त्यात शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीपूर्वी संभाजीराजे आणि शिष्टमंडळातील अन्य नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती संभाजीराजे यांनी ट्विटरद्वारे दिलीय.
दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रपतींसमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. त्यानुसार आज ही भेट होणार आहे.