शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषी अधिकारी सिरसाठ यांचे शेतकऱ्यांना आवाहन
जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वदूर पाऊस झाला आहे . या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच पावसामुळे पेरणीचे वेधदेखील शेतकऱ्यांना लागले आहे. पाऊस मान्सूनपूर्व असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये , असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
खरीप पेरणीसाठी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी लागवड किंवा पेरणी करावी , यासाठी कृषी विभागाच्या ग्रामपातळीवर काम करणारे कृषी सहायक , कृषी पर्यवेक्षक यांनी बहुतांश गावांमध्ये सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता प्रयोग केले आहेत . त्यानुसार शेतकऱ्यांनी करावे . विक्रीच्या बियाणांसाठीदेखील हा पर्याय अवलंबला गेला तर , उगवण क्षमतेनुसार पेरणी करता येईल. ७५-१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी लागवड करू नये . कृषी विभागाच्या वतीने वेळोवेळी पेरणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. दुबार पेरणी टाळण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याची माहिती पैठण तालुका कृषी अधिकारी संदिप सिरसाठ यांनी दिली.