cabinet meeting : चंद्रपुरातील दारूबंदी उठवली… जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दारूबंदी, तौक्ते चक्रीवादळ यासंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील ड्राय डिस्ट्रिक्ट्स पैकी एक असलेल्या चंद्रपुरातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. भाजपा सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री असताना चंद्रपुरात दारूबंदी करण्यात आली होती. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने दारुबंदी उठवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यात विदर्भातील सर्वाधिक जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे.
तौक्ते चक्रीवादळ – नुकसानग्रस्तांना वाढीव दराने नुकसानभरपाई
राज्यात गेल्या आठवड्यात आलेल्या भीषण तौक्ते चक्रीवादळात कोकण किनारपट्टीसह अनेक भागांत मोठे नुकसान झाले. याची नुकसानभरपाई ही वाढीव दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी कोकणाचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी तौक्ते चक्रीवादळात झालेल्या हाणीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच नुकसान भरपाई, मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई वाढीव दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.