यंदाची जनगणना जातीच्या आधारावर करावी…आठवलेंची मागणी
लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात टाकून नवा वाद निर्माण करण्यापेक्षा मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिले जावे, अशी मागणी करत यंदाची जनगणना जातीच्या आधावर करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठ्यांना आरक्षण मिळावं, ही सर्वप्रथम मी मागणी केली, असा दावा आठवले यांनी केला. मी ग्रामीण भागातून येत असल्याने सर्व मराठा बांधव श्रीमंत नसल्याचं मला माहिती आहे. गरीबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या अल्पभूधारक मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली.
आरक्षणाचा कायदा करायचा असल्यास फक्त मराठा समजासाठी तो लागू करता येणार नाही. महाराष्ट्रातील मराठा, हरियाणातील जाट, राजस्थानमधील राजपूत, यूपीमधील ठाकूर, आंध्रप्रदेश येथील रेड्डी या सर्व क्षत्रिय जातींना 10-12 टक्के आरक्षण देण्याची मागणी माझ्या पक्षाने केली आहे. यातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल. 2021 चा जनगणनेचा सर्व्हे हा जातीच्या आधारावर करावा, यासंबंधी पंतप्रधानांना मी पत्र देणार आहे. जातीच्या आधारावर जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. ग्रामीण भागात आजही दलितांवर अत्याचार होत आहेत. दलितांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी आहे", असे आठवले म्हणाले.