एकता कपूर आणि शोभा कपूर विरोधात अटक वॉरंट जारी
बिहारमधील बेगुसराय येथील न्यायालयाने बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट, टीव्ही आणि वेब सिरीजची निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट एकता कपूरने बनवलेल्या XXX वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीच्या आक्षेपार्ह प्रतिमेच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यात काढण्यात आले आहे. बेगुसराय न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या कोर्टातून हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.
6 जून 2020 रोजी माजी सैनिक शंभू कुमार यांच्या वतीने सीजीएम न्यायालयात तक्रार पत्र दाखल करण्यात आले होते. माजी सैनिकाने आरोप केला होता की XXX वेब सीरिजच्या सीझन 2 मध्ये सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती. वेब सीरिजमध्ये असे दाखवण्यात आले होते की, जेव्हा लष्कराचे जवान ड्युटीवर असतात तेव्हा त्यांच्या पत्नी पुरुषांशी अवैध संबंध ठेवतात. त्यामुळे माजी सैनिकांमध्ये नाराजी पसरली असून त्यांच्या वतीने तक्रार पत्र देण्यात आले. एकता कपूर आणि शोभा कपूर यांना फेब्रुवारी 2021 रोजी या प्रकरणात उपस्थित राहून उत्तर देण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते, ज्यामध्ये एकता कपूरच्या कार्यालयातही समन्स प्राप्त झाले होते.
माजी सैनिकांच्या वतीने न्यायालयात तक्रार पत्र दाखल करून आक्षेप घेण्यात आल्याचे या खटल्यातील बाजू मांडणारे वकिलांनी सांगितले. आता न्यायालयाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट जारी झाल्यानंतर एकता कपूर शोभा कपूरच्या अडचणीत वाढ झाली आहे. अधिवक्ता हृषिकेश पाठक यांनी सांगितले की, 524/C 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.