महेश मांजरेकरांकडून महाराष्ट्र दिनी नव्या चित्रपटाची घोषणा
महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली होती. ज्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा असलेले एकल पोस्टर होते आणि सोबत एक महाघोषणा करणार असल्याचेही त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे सकाळपासून चाहते या घोषणेची वाट पाहत होते. अखेर ही महाघोषणा झाली आहे. त्या संदर्भात महेश मांजरेकरांनी एक पोस्ट शेअर करून चित्रपटाचे पोस्टर जाहीर केले आहे. या पोस्टर वर एक भन्नाट कॅप्शन ही त्यांनी लिहिले आहे.
'इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा... मोठ्या पडद्यावर साकारणार... न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम... मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती.. वीर दौडले सात... दिवाळी २०२३..' असे कॅप्शन या पोस्टरला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे त्यांनी हिंदीतही पोस्टर शेयर केले आहे. 'वो सात' (wo saat) असे हिंदी भाषेतील पोस्टरला नाव देण्यात आला आहे. यावरून हा चित्रपट एकाच वेळी दोन भाषांमध्ये होणार असल्याचे दिसते. शिवाजी महाराजांची गाथा सर्वत्र पोहोचवी या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. (veer daudle saat)
येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार असून मराठीतील सर्वाधिक बजेटचा चित्रपट असणार आहे. शिव चारित्रावर होत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये आता महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. या आधीही महेश मांजरेकर यांनी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' (Me Shivajiraje Bhosale Boltoy) या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.