लोखंडी सळयांमधून गांजा तस्करी; पाच कोटीचा माल जप्त
नांदेडमध्ये अंमलीपदार्थ नियत्रण विभागाने केलेल्या कारवाईत १,१२७ किलो गांजा जप्त केला असून यामध्ये एका ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले आहे. हा गांजा लोखंडी सळय़ांमध्ये लपवून आंध्र प्रदेशातून राज्यात वितरणासाठी येत होता. अशी माहिती एनसीबी पथकाने दिली आहे.
हैदराबाद नांदेड मार्गावर नायगाव तालुक्यातील मंजरम येथे एनसीबीने सकाळी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातून काही संशयित लोखंडी सळय़ांमध्ये लपवून गांजा घेऊन येणार आहे. त्यानुसार नांदेडमध्ये सापळा रचण्यात आला. ज्यावेळी हा ट्रक राज्याच्या हद्दीत दाखल झाला. त्यावेळी त्याला संशयावरून थांबवण्यात आले. तपासादरम्यान ट्रकमध्ये लोखंडी सळय़ांमध्ये ४४ गोणी गांजा लवपून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आणि यामध्ये एनसीबीने एकूण १,१२७ किलो गांजा जप्त केला असून त्यांची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली असून पुढील तपास एनसीबी करत आहे.