G-20 खरंच फलदायी ठरणार का?
सुनील शेडोळकर
कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांच्या कामाचे जागतिक मूल्यमापन हे त्यांची फाॅरेन पाॅलिसी कशी आहे यावर शक्यतो केले जाते. जागतिक नेत्यांशी संबंध कसे आहेत यावर त्या नेत्याची जागतिक प्रतिमा आपल्या देशाचा जागतिक पातळीवरचा स्तर ठरवित असते. विकसित देशांत जागतिक पातळीवरील संबंध बनविणे, ते वाढविणे आणि त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारात आपल्या देशाला कसा फायदा होतो याचे आडाखे बांधूनच काम करण्याची पद्धत प्रचलित आहे, विकसनशील देशात मात्र यापेक्षा वेगळी परिस्थिती असते. त्या त्या देशातील अंतर्गत प्रश्न, त्यांची उकल करत कारभार हाकणे यातच बरेच देश भरडून निघत असतात. भारतात मात्र संमिश्र पद्धतीत हे काम झालेले आपणास दिसते. इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक डॅशिंग पंतप्रधान म्हणून तयार करण्यात त्यांनी यश मिळवले होते. कणखर भूमिका घेत अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांनी सौहार्दपूर्ण संबंध ठेवत जागतिक बाजारपेठेत भारताचा चांगला दबदबा निर्माण केला होता. भारत - पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर ही अनेक वर्षे पाकिस्तान कडून भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली जायची, त्यावेळी अतिशय धैर्याने पाकिस्तान बाबत कडक धोरण राबवित इंदिरा गांधींनी पाकिस्तान पासून बांगलादेश वेगळा केल्यावरच परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर ही पाकिस्तान च्या काश्मीर मधून घुसखोरी करण्याचा भरपूर प्रयत्न होत राहिला. तरीही पाकिस्तान चा बीमोड करणारे धोरण ही इंदिरा गांधी यांची उपलब्धीच समजली जाते. त्यानंतर आलेल्या राजीव गांधी यांनी जागतिक पातळीवर लवचिक धोरण स्वीकारत भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार कसा वाढेल याकडे लक्ष देत देशात कम्प्युटर युगाची सुरुवात करुन दिली. डॉ. मनमोहनसिंग अर्थतज्ज्ञ म्हणून जागतिक पातळीवर जगाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर भारताची विस्कटलेली घडी बसविण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. 1991 साली नरसिंहराव पंतप्रधान असताना जगाने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली अशा परिस्थितीत ग्लोबल इकाॅनाॅमी चे वारे जगभरात सुरू होऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांना पायघड्या घालणे जगभरात सुरू झाले. भारतासारख्या विकसनशील देशात विदेशी कंपन्यांना परवानगी देणे म्हणजे येथील बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण मनमोहनसिंग यांनी जागतिक बाजारपेठेत भारताची भूमिका अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडत जगाच्या स्पर्धेत उतरणे कसे अनिवार्य आहे यासाठी आग्रही भूमिका घेतल्यामुळेच जागतिकीकरणाचा दौर भारतासाठी फलदायी ठरला. मनमोहनसिंग स्वतः देशाचे पंतप्रधान असताना त्यांनीच 1991 साली केलेल्या आर्थिक सुधारणांचा उपयोग करून घेत जागतिक बाजारपेठेत भारताचा चांगला दबदबा निर्माण केला.
2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे स्वीकारली. देशांतर्गत व्यापारनीतीची उत्तम जाण त्यांना होती. गुजरात चे मुख्यमंत्री राहिलेले असल्यामुळे देशांतर्गत स्पर्धेत त्यांनी गुजरात माॅडेल यशस्वी केलेले होते. विदेशी गुंतवणूक देशात यावी म्हणून नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2019 अनेक देशांचा दौरा केला, सतत विदेशात जाण्याने मोदींना विरोधक कधी कधी भारतात असणारे पंतप्रधान अशी टीकाही करायचे. संयुक्त राष्ट्र संघात भारताला कायम सदस्यत्व मिळावे म्हणून मोदी यांनी अमेरिका, ब्रिटन, रशिया व चीन सह अनेक देशांमध्ये जाऊन भारताची प्रभावी भूमिका मांडली. 5 ट्रिलियन इकाॅनाॅमी चे स्वप्न उराशी घेऊन नरेंद्र मोदी 2019 मध्ये पुन्हा सत्तेत परतले. 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी केलेल्या विविध देशांच्या दौऱ्यात त्यांनी जे विदेशी जनमत आपल्या बाजूने वळविल्याचा फायदा पाकिस्तान वर केलेल्या एअर स्ट्राईक आणि काश्मीरमधील 370 कलम हटविल्यानंतरचा प्रसंग देशासाठी अनेक विदेशी पाहुणे उघडपणे भारताची उघडपणे घेताना दिसले. दोन वर्षांचा कोरोना काळातही भारतीय अर्थव्यवस्था रुळावर ठेवण्यात सरकारला यश मिळाले. G-20 चे अध्यक्ष पद स्वीकारल्यामुळे भारतात यानिमित्ताने शंभर एक देशाचे प्रमुख येणार आहेत. याद्वारे 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत दोन दिवसीय बैठक होणार असून त्यात सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या सह अनेक देशांचे प्रमुख येणारं आहेत. स्थिर सरकार सतत दहा वर्षे देशाला मिळाल्यामुळे या काळात अनेक देशांतून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आदी आहे.
2024 च्या निवडणुका समोर असताना मोदींनी हा जागतिक इव्हेंट भारतात भरवला आहे. नुकतेच चांद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवांवर साॅफ्ट लॅण्डिंग झाले, त्यांनंतर सूर्यावर यान पाठविण्यातही इस्रोने यश मिळवले आहे. G-20 मुळें दिल्लीत झगमगाट होणार आहे. त्याच्या आधी तीनच महिने G- 20 चे प्रयोग महाराष्ट्रातील मुंबई, पुणे नागपूर व औरंगाबाद येथे पार पडला होता. G- 20 मध्ये भारताने गेल्या दशकभरात आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या यशाचा पाढा मोदीं वाचणार आहेत , त्यापाठोपाठ 18 ते 22 सप्टेंबर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून वन नेशन वन इलेक्शन चा संसदीय जोगवा मागितला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मोठे प्रयत्न केल्याचे सांगितले जाणार. विदेशी गुंतवणूक भारतात मोठ्या प्रमाणावर येत आहे. 2047 पर्यंत भारत जगातील विकसित देशांबरोबर तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे . एकीकडे नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी 28 पक्षांना काॅंग्रेस एका छताखाली आणू पाहात आहे तर दुसरीकडे G- 20 साठी शेकडो विदेशी पाहुणे एकत्र करण्यात नरेंद्र मोदींनी कंबर कसली आहे. बघूयात G -20 हे 2024 साठी किती फलदायी ठरणार ते....