आरेमधील (Aarey Colony) जंगल वाचवण्यासाठी हे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, आता हा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने फिरवला असून हे कारशेड कांजूरमार्गऐवजी आरेमध्येच होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने ‘पर्यावरण? की विकास?’ हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अभ्यासक, संशोधक यांनी दिलेली माहिती, जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेले प्रबंध नाकारून, जैवविविधता नाकारून आरेची जमीन ही केवळ दुग्ध उत्पादनासाठी दिली होती असे सांगत हा भाग म्हणजे जंगल नाही हा मुद्दा मांडण्याचा अट्टाहास का केला जात आहे, हा प्रश्न आता मुंबईकरही विचारू लागले आहेत.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यापासून आधीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांचं काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती मुंबई मेट्रोच्या आरेमधील प्रस्तावित कारशेडची. आरेमधील जंगल वाचवण्यासाठी हे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, आता हा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने फिरवला असून हे कारशेड कांजूरमार्गऐवजी आरेमध्येच होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने ‘पर्यावरण? की विकास?’ हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विकास हवाच; पण त्यासाठी पर्यावरणाला तिलांजली देणे योग्य आहे का? आजच्या विकासासाठी उद्याच्या पिढीचे भवितव्य भकास करायचे की देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पर्यावरणाची किंमत मोजायची?
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सरकारने आरेतील 2700 झाडे कापून त्याजागी मेट्रो कारशेड (Metro Car Shed) करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायलायानेही याला परवानगी दिली. परवानगी मिळताच एका रात्रीत गुपचूपपणे 200 झाडांची कत्तल करण्यात आली. तब्बल 2400 झाडांची कत्तल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने या वृक्षतोडीस तात्काळ स्थगिती दिली. मुंबईच्या मधोमध असलेला आरे कॉलनीचा परिसर तिथली दुग्ध वसाहत आणि दाट वनराईसाठी ओळखला जातो. त्यामुळेच तिथे मेट्रो कारशेडसारख्या विकासकामांना स्थानिक आदिवासी आणि पर्यावरणप्रेमी कायम विरोध करत आले आहेत. मुंबईतील मेट्रो-3 प्रकल्पाची कारशेड आरेमध्ये बांधण्याच्या प्रस्तावाविरोधात गेली काही वर्ष आदिवासी आणि पर्यावरणवादी लढा देत होते. या कारशेडसाठी 2700 झाडं तोडावी लागणार होती आणि वृक्षतोडीला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरुवातही झाली. त्यावरून आरे कॉलनीत आंदोलन झालं होतं आणि पोलिसांनी सुमारे पन्नास आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. केवळ पर्यावरणप्रेमीच नाही, तर मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांनीही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिला होता.
ती केवळ हिरवळ – सरकारचा दावा
मुंबई मेट्रो कारशेडसाठी प्रस्तावित ‘आरे’तील जागेला जंगल संबोधित करू नका, ती केवळ हिरवळ आहे, असा दावा गुुरुवारी राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात करण्यात आला होता. ‘आरे’ हे दुग्ध वसाहत म्हणून स्थापन करण्यात आले होते. त्यादृष्टीने त्या ठिकाणी गायी, म्हैशी आणि घोडे यांचे पालन केले जात होते, अशी माहिती सरकारच्यावतीने हायकोर्टात दिली होती.
‘आरे’चं जंगल इतकं महत्त्वाचं का आहे?
आज आरे कॉलनी म्हणून ओळखला जाणारा हा जवळपास सोळाशे हेक्टरचा भूभाग 1951 साली सरकारच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाकडे देण्यात आला होता. पण त्यातल्या मर्यादीत भागावरच गाई-म्हशींचे गोठे उभारण्याची, त्यांच्यासाठी कुरणं त्यार करण्याची परवानगी मिळाली. तर बाकीच्या भागात जंगल उभं राहिलं. मुंबईची मिठी नदीही याच आरे कॉलनीच्या जंगलातून वाहते. मुंबईत पडणारं पावसाचं पाणी समुद्रात नेणारी ही महत्त्वाची ड्रेनेज सिस्टिम (Drainage System) आहे. या परिसरात बिबट्या, अजगरं असे जंगली प्राणीही राहतात. तसे पुरावे ठाणे वन विभागाच्या पाहणीत आढळून आले आहेत. आरे कॉलनीत पूर्वीपासूनच 29 आदिवासी पाडेही आहेत. तिथे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांचं आयुष्य जंगलावर अवलंबून आहे. याआधी आरे कॉलनीतल्या आदिवसींचं दुसरीकडे पुनर्वसन करण्याचया प्रस्तावांनाही विरोध झाला होता.
“पण आरे हे जंगल आहे.” कारण –
मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कारशेडमध्ये अडथळा ठरणारी झाडे कापण्याचा निर्णय घेतला कारण त्यांच्यामते आरे हे जंगल नाहीये.
प्रत्येक झाड वर्षभरात 20 किलो कार्बनडायऑक्साईड (CO2) शोषून घेते. जेव्हा तुम्ही 80 किमीपर्यंत तुमची कार चालवता तेव्हा एवढा कार्बनडायऑक्साईड (CO2) बाहेर फेकला जातो.
आरेमध्ये पक्षी, फुलपाखरं, सरपटणारे प्राणी, कोळी आणि अशा 240 प्रजातींच्या पक्षी आणि प्राण्यांचे घर आहे.
आरेमध्ये दहा हजाराहूंन जास्त आदिवासी पिढ्यांपिढ्या इथल्या झाडांना कोणतीही इजा न करता राहत आहेत.
याबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत…
या रोपांची काळजी कोण घेणार?
शहरातील पूल वाचविण्यासाठी आपण त्याच्यावर मेट्रो बांधू शकतो तर झाडं वाचविण्यासाठी का नाही?
आपल्याला खरचं 32 मजली मेट्रो भवनाची गरज आहे का? आणि ते ही जंगलाच्या बरोबर मध्यात?
कारशेडनंतर ही वृक्षतोड थांबणार की ही फक्त सुरवात आहे?
आरेमध्ये होणार या तीन गोष्टी –
SRA प्रकल्प (Slum Rehabilitation Authority)
मेट्रो कारशेड (Metro Card Shed)
प्राणी संग्रहालय (Zoo)
आरे जंगल नष्ट झाल्यावर होणारे परिणाम-
पाण्याची भूजल पातळी घटणार
धूळ वाढणार
प्रदूषण वाढणार
आरेच्या हरितसंपदेवर अनेक वन्यजीव अवलंबून
आरेमध्ये ब्रिटिशांनी काही कोळी शोधले होते. त्यानंतर सुमारे 100 वर्षांच्या कालावधीनंतर हे कोळी दिसले. आरेसारख्या ठिकाणी अनेक गोष्टींबद्दल अजूनही संशोधन झालेले नाही. मेट्रो कारशेड झाली तर असे अनेक वन्यजीव दिसण्याआधीच नाहीसे होतील. ही वन्यजीवसंपदा जपायची असेल तर मुळात आरे हे जंगल आहे, हे मान्य झाले पाहिजे अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आरेच्या मेट्रो कारशेडचा भाग केवळ पाहिला तरी तिथे गच्च झाडी दिसते. हे पानगळीचे जंगल आहे. इथे उंच 100 वर्षांपूर्वीची झाडे आहेत तसेच गवतही आहे. केवळ वृक्षसंपदेमध्ये एवढी वैविध्यता असलेल्या ठिकाणाला जंगल का म्हणायचे नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला. या हरितसंपदेवर अनेक प्रकारचे प्राणी, कीटक, सरपटणारे प्राणी अवलंबून आहेत. आरेमध्ये ब्लू मॉरमॉन (Papilio polymnestor) हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू, राज्यफुलाचा दर्जा असलेले ताम्हण (Pride of India) आणि राज्यपक्षी हरियालसुद्धा (Yellow-footed green pigeon) इथे आढळतो. मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली गेली, भराव घातला गेला किंवा माती काढण्यात आल्यास किटकांसह अनेक घटकांना धोका निर्माण होऊ शकतो. याचा अन्नसाखळीवर परिणाम होण्याचीही भीती आहे.
आरेत बिबळ्यांचा मुक्त वावर
वन्यजीव अभ्यासक आणि प्रसिद्ध वन्यछायाचित्रकार नयन खानोलकर यांनी आरेमध्ये 2014 मध्ये अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा कॅमेरा ट्रॅप (Camera Trap) लावले होते. 2014 मध्ये या कॅमेऱ्यामध्ये बिबळ्याची मादी, ल्युना (Luna) दिसली. ही मादी आरेमधील स्थानिक आहे, असे त्यांच्या अभ्यासात समोर आले आहे. या मादीने आरेमध्ये आठ बिबळ्यांना जन्म दिला आहे. आरेतील बिबळे ज्या वाटेने ये-जा करताना आढळले आहेत, त्या जागेपासून कारशेडची जागा अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे. जगातील सर्वांत दुर्मिळ मांजराची जात, रस्टी स्पॉटेड कॅट (Rusty-spotted cat) म्हणजे रानमांजर कारशेडपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर दिसली होती, अशी माहिती त्यांनी दिली. खानोलकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे बिबळ्यासारखा प्राणी ज्या भागामध्ये राहतो, त्याला जंगल का नाही म्हणायचे असेही विचारण्यात येत आहे.
अभ्यासक, संशोधक यांनी दिलेली माहिती, जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेले प्रबंध नाकारून, जैवविविधता नाकारून आरेची जमीन ही केवळ दुग्ध उत्पादनासाठी दिली होती असे सांगत हा भाग म्हणजे जंगल नाही हा मुद्दा मांडण्याचा अट्टाहास का केला जात आहे, हा प्रश्न आता मुंबईकरही विचारू लागले आहेत.