गणपती आणि नंदी
गेल्या २६ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९५ च्या सप्टेंबर महिन्यात अचानक एक अफवा पसरली की, गणपती दूध पिऊ लागला. राज्यातील आणि देशातील अनेक गणपती मंदिरांमध्ये तोबा गर्दी झाली होती… प्रत्येकजण मूर्तीला दूध पाजत होता…. आता पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती होण्याचा प्रकार घडला… दोन दिवसांपूर्वी महादेवाचा नंदी दूध आणि पाणी पिऊ लागल्याची अफवा पसरली… नंदीला दूध-पाणी पाजण्यासाठी मंदिरांमध्ये गर्दी होवू लागली… लोकांना आवरण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांना बोलवावे लागले… आपल्याकडे अशा अफवा ज्या वेगाने पसरतात, त्यांना आवरणे कठीण होवून जाते… गेल्या २६ वर्षांपूर्वी मूर्तीला दूध पाजण्याची अफवा पसरली तेव्हा ना लोकांकडे मोठ्या प्रमाणावर मोबाईल होते, ना व्हाट्सअप होते ना सोशल मिडिया… तरीही काही तासांमध्ये ही बातमी वाऱ्याच्या वेगासह पसरली… हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांनी देवघरातील गणपतीच्या मूर्तीला दूध पाजण्याचा प्रयत्न केला… त्यासाठी अनेकांनी ऑफिसमधून लवकर घरी धाव घेतली होती… दुपारनंतर सर्व कार्यालये अक्षरशः ओस पडली होती… दुकाने, चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स अशा सर्वच ठिकाणी एकच चर्चा रंगली होती. गणपती दूध पितो… त्या दिवशी दुधाच्या पिशव्यांची कधी नव्हे इतकी विक्री झाली. लोकांनी वेगवेगळ्या धातूंच्या मूर्तीवर प्रयोग केले… लोक १०० टक्के प्रयोग यशस्वी होत असल्याचे प्रमाण देवू लागले होते… अनेकांना हा प्रयोग यशस्वी होत नसल्याचे माहित असतानाही ते सांगण्याची हिम्मत कोणी करत नव्हते… याचे कारण त्यावेळी वस्तुस्थिती सांगितली असती तर लोकांनी सत्य सांगणाऱ्यालाच वेड्यात काढले असते… त्यावेळी वृत्तवाहिन्यांची संख्याही मर्यादित होती… तरीही गावागावात ही बातमी पसरली होती… तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी स्वतः गणपतीला दूध पाजल्याचे सांगितले होते.. साहजिकच या बातमीनंतर गणपती दूध पितो या अफवेला पुष्टी मिळाली होती… अनेकांनी ही निव्वळ अंधश्रध्दा असून केवळ 'सरफेस टेन्शन' मुळे दूध किंवा पाणी दगडी मूर्तीजवळ खेचले जाते, असे वैज्ञानिक कारण होते… मात्र, त्याची पुष्टी योग्य पध्दतीने न झाल्याने लोकांनी अफवेवरच अधिक विश्वास ठेवला… दोन दिवसांपूर्वी नंदी पाणी पितो, अशीच एक अफवा पसरली आणि सोशल मिडियावर या बातमीनं धुमाकूळ घातला… जागोजागच्या शंकराच्या मंदिरात नंदीला पाणी पाजण्यासाठी भाविकांनी गर्दी केली… काही महिलांनी नंदी दूध पित असल्याचे आणि काहींनी नंदी पाणी पित असल्याचे ठामपणे सांगत त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल केले… ग्रामीण भागात हजारोंची गर्दी नंदीला दूध-पाणी पाजण्यासाठी जमली… त्यावर लोकांनी गेल्या 26 वर्षांपूर्वी गणपतीची कशी अफवा पसरली याची चर्चा रंगवून करत होते…मात्र, आत्ताच्या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता…हे अनाकलनीय आहे… गणपती असो वा नंदी अशा कोणत्याही घटनांना शुभ-अशुभ अशी जोड दिली जाते… मध्यंतरी महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मीच्या मूर्तीच्या गळ्यात असलेले मंगळसुत्र तुटल्याची जोरदार अफवा होती… ही घटना सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत वाईट असल्याचेही सांगितले गेले होते, त्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले… याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा एखाद्याच्या मनात भितीचे घर बनते तेव्हा ती व्यक्ती अशा काही गोष्टींना स्वतःच पुष्टी देते आणि आपल्यासह अनेकांना म्हणजेच समुहाला ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करते… इतिहासात 'ध चा मा' करणे ही म्हण प्रचलित आहे… ती घटनाही भितीपोटीच झाल्याचे दाखले इतिहासात आहेत.. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजुला सर्रास घडत असतात… त्यात किती सत्य असते वा नाही… याची कोणतीही खतरजमा न करता लोक ती गोष्ट आपल्या निकटवर्तींयांना सांगतात… एकाकडून दुसऱ्याकडे आणि तेथून तिसऱ्याकडे या गतीनं ती गोष्ट काही क्षणात अनेकांपर्यंत पोहचलेली असते…त्यानंतर कोणीच त्यामागचे सत्य शोधायचा प्रयत्न करत नाही किंवा त्याचा उगम शोधत नाही… ज्या वेळेला ती अफवा आहे हे समजते तोवर पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेले असते… एखादी अफवा पसरायला कुठेतरी घडलेली एक छोटीशी घटना पुरेशी असते… आपण त्याला राईचा पर्वत करणे असेही संबोधतो… पण अलिकडे अशाच घटनांना अधिकची प्रसिध्दी मिळते… यात माध्यमांचीही तेवढाच मोठा वाटा आहे.. एखादी अशी बातमी जी अफवा आहे, म्हणूनही अधिक पसरवू नये याचे कारण ती ज्यांना माहित नसते वा ज्यांच्यापर्यत पोहचलेली नसते, त्यांच्यापर्यंत ती पोहचते… त्यामुळे अशा बातम्यांना किती आणि कशी प्रसिध्दी द्यावी याची एक आचारसंहिता असण्याची गरज आहे… ही आचारसंहिता आपण सर्वांनी स्वतःहून पाळणे आवश्यक आहे…
-नरेंद्र कोठेकर