raj thackeray image
raj thackeray image

धोक्याचं आणि मोक्याचं..!

Published by :
Vikrant Shinde
Published on

महाराष्ट्रातील राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (mns) राजकीय पटलावर यश मिळाले नसले तरी राज ठाकरे यांची लोकप्रियता कायम आहे… शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यावर 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे (raj thackrye) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली… स्थापनेच्याच दिवशी त्यांनी 'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा' ही भूमिका घेत पक्षाची चौकट केवळ राज्य आणि मराठी माणसांपुरती आखून घेतली… मराठी माणसांच्या हक्कासाठी लढण्याचे शिवसेनेचं जुनं तंत्र राज ठाकरे यांनी आत्मसात केलं… परप्रांतीयांचा मुद्दा ऐरणीवर घेत मनसैनिकांनी कल्याण रेल्वे (kalyan railway station) स्थानकात घातलेल्या राड्याचे पडसाद देशभर उमटले… रेल्वे भरतीवेळी मनसे सैनिकांनी केलेल्या मारहाणीनंतर आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर टिका केल्यानंतर परप्रांतीय विरूध्द मनसे ही विरोधातील लाट उसळली असली तरी मराठी माणसांच्या मनात मनसेने घर केले… पक्षस्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षात मनसेची राज्यातील लोकप्रियता वाढत चालली होती… त्याचा फायदा त्यांना 2009 मध्ये झालेल्या विधानसभेला झाला.. या निवडणुकीत मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले… मनसेच्या या यशाची दखल राज्यातील मोठ्या पक्षांना घ्यावी लागली.. त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मनसेला चांगले यश मिळत गेले… कल्याण-डोंबिवली आणि नाशिकची सत्ता मनसेच्या वाटेला आली… मनसेची स्थापना करताना महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार ठेवणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेने सत्ता मिळूनही लोकोपयोगी कामे केली नाही… राज्यात 13 आमदारांचे पाठबळ असताना त्यानंतरची मनसेची कामगिरी आश्वासक राहिली नाही… त्यानंतरच्या बहुतांश निवडणुकीत मनसेला म्हणावं तसं यश मिळालं नाही… ज्या-ज्या ठिकाणी सुरूवातीला त्यांना यश मिळाले होते तेथे नंतर त्यांचे मताधिक्य कमी होत गेले… राज ठाकरे यांच्या सभांना तोबा गर्दी होत असली तरी त्याचे परिवर्तन मतांमध्ये होत नव्हते… त्यानंतरच्या काळात मनसेच्या अनेक शिलेदारांनी पक्षाला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केला… राज्यातील मनसेची पकड कमी होत असल्याचे चित्र दिसू लागले.. दरम्यान त्यांचे टोलमाफीचे आंदोलन राज्यभर गाजले…पण नंतर त्यांनी तो मुद्दाच लावून धरला नाही.. असे अनेक मुद्दे मनसेकडून उचलेले गेले पण, काही कारणाने त्याचा योग्य पाठपुरावा झाला नसल्याने अनेक गोष्टींपासून मनसे दूर होत गेल्या… मराठी मतांचा जोगवा मागितल्यावर सुरूवाताली मराठी माणसांनी मनसेला भरभरून मते दिली होती… मनसेवर लोकांचा विश्वास होता… मात्र राजकीय पटलावर पक्षाची अनेक गणिते चुकत गेली… शिवसेनेपासून(shivsena) दूर झालेल्यांचा पक्ष म्हणून मनसेची ओळख असली तरी त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली नाही…त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही जनतेच्या प्रश्नांना थेट साद घालता आलं नाही… मनसे हा केवळ निवडणुकीपुरता असलेला पक्ष अशी पक्षाची ओळख निर्माण होवू लागली.. मागील दोन निवडणुकीत मनसेचे मताधिक्य कमालिचे घटले.. ज्या महापालिकेत सत्ता मिळाली होती.. तेथील सत्ता मनसे टिकवू शकली नाही… काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेचा वाटा राहिला असला तरी त्यांचा वरचष्मा मावळत गेला… मनसे केवळ शहरांपुरता असलेला पक्ष अशी एक वेगळी ओळख मनसेने निर्माण केली… राज ठाकरे यांचा करिष्मा कायम राहिल्याचे त्यांचा कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीतून मिळतेय, मात्र त्याचा पक्षाला किती प्रणाणात फायदा होईल, हे सांगता येणार नाही… एक काळ असा होता की, राज्याच्या सत्तापदावर कोण बसणार? याची चावी मनसेच्या हाती असेल असा दावा करणाऱ्या राज ठाकरेंना गेल्या 16 वर्षात तशी एकदाही संधी मिळाली नाही… राज ठाकरे यांच्याकडे गर्दी जमवण्याचे तंत्र असले तरी जमलेली गर्दी आपल्या पक्षाच्या विचारधारेशी कशी एकरूप होईल, याचे तंत्र मनसेला अद्याप अवगत करता आलेच नाही… मनसेने पहिल्यांदाच त्यांचा वर्धापन दिन मुंबईबाहेर म्हणजेच पुण्यात साजरा केला… यावेळी पक्षाच्या 16 व्या वर्षाच्या वाटचालीबाबत बोलताना पक्षाचे नेते बाळ नांदगावकर यांनी हे सोळावं वरीस अन्य पक्षांसाठी धोक्याचं आणि पक्षासाठी मोक्याचं असल्याचं म्हटलंय… या वर्षात राज्यातील दहा मोठ्या शहरातील महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यात मुंबई-ठाणे, पुणे आहे, जेथे पक्षाची ओळख आहे… तेथे त्यांना यावेळी चुणूक दाखवता येईल… मागील काही दिवसात मनसे भाजपाशी हातमिळवणी करणार अशाही चर्चा आहेत.. तशा काही बैठकाही झाल्यात, मात्र त्या बैठकांना मूर्त स्वरूप आले नाही… मनसेला भाजपासोबत जायचे असेल त त्यांनी त्यांचा परप्रांतीयांबबतचा मुद्दा मवाळ करण्याची गरज आहे… अशा सूचनाही भाजपाकडून दिल्या आहेत.. आता मनसेचे अस्तित्वच मराठी मतांवर असल्यानं त्यांनी भाजपासोबत जाण्याची चूक करू नये असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणं आहे… गेल्या तीन वर्षात राज्यातील सत्तेची गणितं बदलली असल्यानं पक्षापक्षांचं मताधिक्यही बदललं आहे.. शिवसेना भाजपासोबत गेल्या पाच वर्षात एकत्र राहिली होती. मात्र भाजपाने 2019 च्या निवडणुकीत ज्याप्रकारे मुसंडी मारली तो चमत्कार शिवसेनेला करता आला नाही.. याचाच अर्थ भाजपानं राजकीय रणनितीत शिवसेनेला व्यवस्थित रोखलं… आता मनसे जरी भाजपासोबत गेली तर त्यांची अवस्था शिवसेनेपेक्षा वेगळी होणार नाही… त्यामुळे आगामी काळात मनसेचे जी रणनिती असेल तीच त्यांना मोक्याची ठरू शकेल… दोन दिवसांपूर्वी पाच राज्यांच्या निकालात आपने केलेली कामगिरी पाहता मनसेपेक्षा कमी राजकीय वय असलेल्या 'आप'ने मोठी कामगिरी केलीय… त्यांनी आता दोन राज्यात सत्ता मिळवलीय… मनसेने किमान स्वतःचे अस्तित्व दिसेल असे मताधिक्य मिळवण्याची गरज आहे… न पेक्षा धोका नसला तरी मोका मिळूनही मनसे काही ठोस करू शकणार नाही…

-नरेंद्र कोठेकर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com