POKची खेळी मोदी 2024 साठी खेळणार का?
सुनील शेडोळकर, गेल्या आठवड्यात G 20ची दोन दिवसीय विश्व परिषद नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारलेल्या भव्य अशा भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे यजमानपद भारताकडे असल्याने जागतिक पातळीवर नोंद घेतली जावी अशा दिमाखदार पद्धतीने हा सोहळा आयोजित केला होता. परिषदेचे अध्यक्ष म्हणून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास ही 2014 व 2019 च्या निवडणुकीचे घोषवाक्य उच्चारल्यामुळे 2024च्या निवडणुकांसाठीची ही रंगीत तालीम होती की काय? असे विरोधकांना वाटून गेले. गेल्या 9 वर्षांत हे घोषवाक्य भारतात अनेक वेळा मोदींच्या तोंडून ऐकले गेले पण जगातील 40 पेक्षा जास्त देशांचे प्रमुख आलेले असताना त्यातही अमेरिका, ब्रिटन, इटली अशा मोठ्या राष्ट्रांचे प्रमुख उपस्थिती असताना भारताचे वैश्विक रुप दाखवले ज्याची दूरदूरपर्यंत चर्चा झाली व सध्याही ती होते आहेत. राजकारणात धक्का तंत्र वापरण्याची नरेंद्र मोदी यांची पद्धत बऱ्यापैकी प्रचलित झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांनी ही गोष्ट फारशा मनावर घेतली नसली तरी 2024 साठी ज्यांनी मोदींना विरोध म्हणून खूप मोठा जोर लावला आहे त्यांना मात्र यात काही तरी शिजत असल्याची शंका आली असणार. इंडिया आघाडीने उभारलेल्या 28 पक्षांची ही मजबूत भिंत भेदून जाणे नरेंद्र मोदी यांना अवघड असल्याने पंतप्रधान भारतात विरोधी पक्षांना एकसंघ राहू देत नसल्याचा आरोप काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बेल्जियम मध्ये जाऊन केला. G20 च्या भोजन समारंभात मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण न दिल्याने राहुल गांधी असे बोलले असतील असे वाटत होते पण मोदी सरकारमधील एक राज्यमंत्री असलेले नेते जनरल व्ही.के. सिंग हे G20 च्या समारोप समारोहानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत POK बद्दल काही बोलले. कुठलाही विषय नसताना किंवा तसा अजेंडा नसताना व्ही.के. सिंग आहे का बोलले असतील याचा कयास नंतर लावला जात आहे. भारताचे लष्करप्रमुख राहिलेले जनरल व्ही.के. सिंग हे युपीए च्या काळातच लष्करप्रमुख झाले होते. देशाचा लष्कर प्रमुख होणं लष्कराच्या कोणत्याही सदस्याचे स्वप्न असते आणि व्ही.के. सिंग यांना ते मिळालेही होते.गेली साडेचार वर्षे ते मोदींच्या मंत्रिमंडळात सडक व परिवहन खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत, ते नेमकं काय काम करत आहेत याची कुणालाही माहिती नाही, पण काश्मीर आणि लेह लडाख येथे रस्त्यांची आणि बोगद्यांची कामे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे काश्मिरात फिरायला गेलेल्या अनेकांना ते जाणवले आहे. रस्ते बांधणी म्हटले की चटकन नितीन गडकरी यांचे नाव आणि त्यांचे कार्य डोळ्यांसमोर येते, पण त्यांच्याच खात्यात राज्यमंत्री असलेले व्ही.के. सिंग सीमेरेवर रस्त्यांची मोठ्या प्रमाणात बांधणी करीता आहेत. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये ही व्ही.के. सिंग संरक्षण राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. नरेंद्र मोदी यांनी अनेक मंत्र्यांना आजवर रिपोर्ट कार्ड च्या कारणावर मंत्रिमंडळातून बाहेर काढलेले आहे, पण एकाही मंत्र्याने मोदींना विरोध केला नाही हे मोदींचे पंतप्रधान म्हणून सहकाऱ्यांचा मिळविलेला विश्वास हा मान्य केला पाहिजे. व्ही.के. सिंग हे लष्करप्रमुख राहिलेले असले तरी ते कमांडो म्हणून प्रशिक्षण घेतलेले आहे. काश्मीरमधील कलम 370, राम मंदिराची उभारणी, देशात समान नागरी कायदा आणि पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात आणणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्यापासूनचे स्वप्न आहे. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आणि संसदे बाहेर नेहमीच या गोष्टींचे जाहीरपणे समर्थन केलेले आहे. नरेंद्र मोदी यांनी मात्र पूर्ण बहुमत असणारे सरकार स्थापन करुन संघाचा अजेंडा राबविण्यासाठी व ते सत्यात उतरविण्यासाठी व्यूहरचना आखली आहे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठीची देखरेखही स्वतःच करीत आहेत असे जाणवते. पंतप्रधानपदाच्या पहिल्या टर्ममध्ये नरेंद्र मोदींनी परदेश दौऱ्याचा सपाटा लावला होता. अगदी त्यांचे विरोधक कधी कधी भारतात असणारे देशाचे पंतप्रधान अशी अवहेलनाही करायचे, पण नरेंद्र मोदी एवढ्या देशांना का भेटी देत आहेत हे आॅगस्ट 2019 मध्ये काश्मीरमधील कलम 370 व कलम 35 A हटविल्यानंतर या मोठ्या निर्णयानंतर जगभरातून भारताला होणारा विरोध कमालीचा रोडावल्याचा दिसला. पाकिस्तान 370 वरुन थयथयाट करीत असताना चीन वगळता अन्य कुठल्याही देशाने यावर फारसे व्यक्त न होणेच पसंत केले. नरेंद्र मोदी यांनी हे केलेले विदेश भ्रमण हे जगभरातील जोडलेले हे मित्र 370 वेळी कामी आले, अगदी मुस्लिम राष्ट्रांनाही मोदींनी विश्वासात घेतलेले दिसले. तुर्कस्तान ने त्या वेळी थोडीफार आगपाखड केली होती. G 20 च्या आंतरराष्ट्रीय समारोहासाठी तुर्की या वेळी मोदींचे विशेष निमंत्रित पाहुणे होते. पाकिस्तानवर एअरस्ट्राईक व सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी मोदींनी पुलवामा घडवला अशी टीकाही मोदींवर आपल्याच देशातील विरोधी पक्षांनी केली होती, विरोधकांच्या आरोपांना उत्तर न देता पुढील लक्ष्याकडे मार्गक्रमण करणे ही मोदींची कार्यशैली राहिली आहे. जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन ठरलेले आहे. काशी विश्वनाथ, वाराणसी, उज्जैन हे मोदींनी उभारलेले काॅरिडोर धार्मिक पर्यटन वाढीस लावणारे असून त्यात आता अयोध्येची भर पडणार आहे.
राम मंदीर उद्घाटन ते लोकसभा निवडणूक म्हणजे जानेवारी ते मे या चार महिन्यांत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नवा धमाका करु शकतात आणि त्याची वाच्यताच जनरल व्ही.के. सिंग यांनी POK बाबत G 20 समारोपानंतर करण्यातून दिसून येते असे वाटते. G 20 चे भव्य आयोजन आणि त्याचे अमेरिकेच्या अध्यक्षांपासून उपस्थित सर्वच राष्ट्र प्रमुखांनी तोंडभरून कौतुक केलेले असताना POK चा मुद्दा येणं हा योगायोग नक्कीच नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अराजक माजलेले आहे. इम्रान खान हे पायउतार झाल्यानंतरची पाकिस्तान मधील चिघळलेली परिस्थिती व भरमसाठ वाढलेली महागाईचा देशात उद्रेक झाला आहे. पाकव्याप्त काश्मीर हे भूतलावरील स्वर्ग पाकिस्तानच्या लष्करांमुळे दहशतवादाचे केंद्र म्हणून अनेक दशकं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. काश्मीरमधील 370 कलम हटविण्यापूर्वी भारताने केलेले एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक मुळे पाकिस्तानमधील दहशतवादाचा बीमोड झाल्याचा खरा आनंद हा पाकव्याप्त काश्मीर मध्ये साजरा केला गेला आहे. पाकिस्तान सरकार विरोधात उघडपणे संघर्ष करण्याच्या मनःस्थितीत तेथील जनता असून नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून आमची सुटका करण्याचे आवाहन मुझफ्फराबाद, गिलगिट, बाल्टीस्तानातून केले गेले. काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर कुठल्याही शक्तींनी डोकं वर काढू नये अशी खबरदारी मोदी - शहांनी घेऊन निर्णय घेतला, त्यात आंतरराष्ट्रीय प्रतिमा सांभाळून भारतातून होणारा विरोधही दडपून टाकण्याची रणनीती मोदी - शहा शोधत आहेत का? अशी शंका व्ही.के. सिंग यांनी POK बाबत व्यक्त केलेल्या टायमिंग खडे पाहता म्हणता येईल.
इकडे ईडी, सीबीआय व इनकम टॅक्स यांची दहशत देशी विरोधकांवर ठेवत, त्यांना गाफिल ठेवून आंतरराष्ट्रीय मित्रांची फौज भारताच्या बाजूने जोडून त्यांचा विश्वास संपादन करण्याची ही कूटनीती तर नरेंद्र मोदी अवलंबीत नसावेत ना? त्यादृष्टीने तर ते 2024 चे रणांगण काबीज करण्याचे स्वप्न रंगवत आहेत का? असा मोदींचा आविर्भाव पाहून वाटते. इंडिया आघाडी हळूहळू आपला जम बसवीत असतानाच देशप्रेम, 140 परिवारजन असे मोठमोठ्या शब्दांची फेक 2024 साठी कोणता नवा डाव मांडून ध्रुवीकरणाचा मार्ग दृष्टीला पडतो हे येणारा काळच सांगू शकेल. तोपर्यंत पाहूयात इंडिया आणि भारत या दोन तुल्यबळ पक्षात रंगणारा 2024 चा कलगीतुरा.....!