मोदींच्या तिसऱ्या टर्म हट्टापायी भाजपची महाराष्ट्रात पिछेहाट झाली का?

मोदींच्या तिसऱ्या टर्म हट्टापायी भाजपची महाराष्ट्रात पिछेहाट झाली का?

15 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री व 15 वर्षे देशाचे पंतप्रधान असा 30 वर्षांचा काळ सर्वोच्च पदावर राहिल्याचा तोरा त्यांना आपल्या नावासमोर लावायचा तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
Published on

- सुनील शेडोळकर

भारतीय जनता पक्षाने आपल्या आरंभाच्या काळापासून म्हणजे अगदी जनसंघापासूनच देशात एक विशिष्ट असा अजेंडा घेऊन राजकारण करण्याचे मनसुबे रचले आहेत. सुरुवातीच्या काळात कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्य काळात देशात झालेल्या कामाचा राजकीय फायदा उचलत मोठ्या कालखंडासाठी सत्ता मिळवली, राबवली आणि उपभोगली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा सत्ताकाळ हा कॉंग्रेससाठी ऊर्जितावस्था देणारा काळ होता. नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळात जनसंघाने प्रयत्न करुनही एका मर्यादेपलीकडे पक्षवाढीला म्हणावा तेवढा वाव मिळू शकला नाही. दुसरे पर्व सुरू झाले 1980 मध्ये.

मोदींच्या तिसऱ्या टर्म हट्टापायी भाजपची महाराष्ट्रात पिछेहाट झाली का?
14 हजार शाळा बंद करुन सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे का?

भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद आले, तेव्हापासून या पक्षाने एका विशिष्ट वर्गाला जोडणारा पक्ष ही आपली छबी बदलण्यास सुरुवात केली आणि सर्व समाजांना, जातिधर्माला जोडण्याची भूमिका घेत देशपातळीवर पक्ष पोहोचविण्याचा नारा दिला आणि त्याप्रमाणे पक्षाची ध्येयधोरणे अनेकांना जोडणारी व ती जोडण्यास सुसंगत असावीत अशी त्याची रचना केली. रामजन्मभूमी-बाबरी मशीद या जुन्या वादात असलेल्या जागेचा शिलान्यास करण्यास 1985 मध्ये राजीव गांधी यांच्या सरकारने परवानगी दिली आणि त्यानंतर देशभर राजकीय वातावरण गढूळ होत हिंदूंना एकवटण्यासाठी भाजपने कंबर कसली. कॉंग्रेस पक्ष हा दलित-मुस्लिमांना अनुकूल अशी धोरणं ठरवून लांगूलचालन करत असल्याचा आरोप भाजपने नेहमीच केलेला त्यासाठी देशभर रान पेटवायला सुरुवात केली. देशाच्या सत्तेत येण्याचे मोठे स्वप्न भाजपने पाहिलेले होतेच. पण गांधी परिवारातील झालेले तीन पंतप्रधान आणि लोकांच्या मनावर असलेले गारुड भाजपच्या प्रयत्नांना खीळ घालत. देशात आघाडी सरकारचा 1977 सालच्या प्रयोगाचा दुसरा अंक तब्बल 12 वर्षांनी व्ही.पी. सिंग यांच्या काळात 1989 साली सुरू झाला. 1991 साली राजीव गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेसही संख्याबळ जमत नसतानाही वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेत भाजपचे सत्तेतील मनसुबे उधळून लावले. नरसिंहराव यांनी अल्पमतातील सरकार पूर्ण काळासाठी चालविण्याचे राजकीय चातुर्य दाखविले. कधी कॉंग्रेस तर कधी भाजप असे आलटून पालटून देशाच्या सत्तेत राहण्याचा प्रयत्न भाजपने कसोशीने केला, पण सत्तेची ऊब अन्य पक्षांना सोबत घेऊन राखणं भाजपसाठी नेहमीच त्रासदायक राहिले आहे.

30 वर्षांची आघाडी आणि युतीतील सत्ता ही भ्रष्टाचारास पायबंद घालण्यासाठी असमर्थ ठरत असल्याचे 2014 साली नरेंद्र मोदी यांना पूर्ण बहुमत देत सरकार बनविण्याची संधी दिली असा निष्कर्ष काढून भारतीय जनता पक्षात तिसरे पर्व नरेंद्र मोदी यांचे सुरू झाले. राजकीय अजेंडा स्पष्टपणे समोर ठेवून व त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याचा पूर्ण उपयोग नरेंद्र मोदी यांनी घेण्यास सुरुवात केली. समोरच्याला धडकी भरविण्याचे राजकारण अशी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचा भाग समजला पाहिजे. त्याची सुरुवात त्यांनी स्वपक्षापासूनच केल्याने विरोधकांना निष्प्रभ करण्यात मोदींनी यश मिळवले. ज्या अटलबिहारी वाजपेयी यांनी 2001 मध्ये गुजरातमध्ये केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवून संघप्रचारक असलेल्या नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री केले तर गोध्रा हत्याकांड झाल्यानंतर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष असलेले मुरली मनोहर जोशी आणि उपपंतप्रधान असलेले लालकृष्ण अडवाणी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे नरेंद्र मोदींना राजधर्माचे पालन करुन मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होण्याचे फर्मान मागे घेण्यात शिष्टाई केली त्या तीनही भाजप वरिष्ठांना संसदीय राजकारणातून निवृत्त करत थेट मार्गदर्शक मंडळात टाकून आपल्या राजकारणाची चाहुलाची ओळख दिली होती. यासाठी संसदीय राजकारणासाठी 75 वर्षं वयाची अट लागू करणारे नरेंद्र मोदी हे देशातील पहिलेच राजकारणी ठरले, या निर्णयाला अनेकांनी चांगली सुरुवात म्हणूनही पाहिले.

2014 आणि 2019 चे मैदान स्वबळावर बहुमताने मारल्यानंतर सत्तेवर येताना स्वपक्षांतील लोकांना लावलेला नियम अन्य विरोधकांना लावून शतप्रतिशतचे स्वप्न पाहिले, पण त्याची अंमलबजावणी करताना वेगवेगळे हतखंडे वापरले त्यावरुन अन्य विरोधकांमध्ये काहुर माजले आणि नरेंद्र मोदी हे विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत अशा आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाने एका रात्रीतून कुस बदलल्यामुळे नीती-कुटनीती या राजकारणातील शालिनतेची जागा कुरघोडी आणि एकमेकांना राजकारणातून संपविण्याच्या राजकारणाने घेतल्याचे चित्र दिसून आले. यासाठी स्वतः खाली पडून वरच्याचा जीव घेण्याच्या कुस्तीतील आखाड्याचा राजकीय प्रयोग केला गेला. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते‌ 2019 ही पाच वर्षे ठीकठाक राज्यकारभार हाकला ते देवेंद्र फडणवीस आज वेगळ्याच अॅक्शन मोडमध्ये काम करताना दिसतात. उद्धव ठाकरेंनी धोका देत ऐनवेळी महाविकास आघाडीसोबत जात भाजपला सत्तेपासून रोखले, त्यासाठी जे आकड्यांचे त्रैराशिक मांडून उद्धव ठाकरे यांनी भाजपचा डाव मोडला, अगदी तशाच पण राजकारणाची भीती वाटावी इतक्या भयानक पद्धतीने भाजपने उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. नुसते सरकारच पाडले नाही तर उद्धव ठाकरे यांचे 40 आमदार फोडून पक्षच संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. अडीच वर्षे जर फडणवीस थांबले असते तर कदाचित भाजपला 2024 साठी 200 जागा जिंकून कमबॅक करणे सहज शक्य होते. तेवढा ताकदीने देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता उभा केला होता. आज उद्धव ठाकरेंना कायदेशीर लढाईत गुंतवून ठेवत 2024 चे लक्ष भरकटविण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. शिवसेनेनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाविकास आघाडी स्थापनेचा हिशेब पूर्ण केला असे म्हटले जाते.

भारतीय जनता पक्षाने राजकारण हे वेगळ्या पद्धतीचे अन् बुचकळ्यात टाकणारे सुरू केले आहे. आज महाराष्ट्रातील कोणत्याही सामान्य माणसाला जर 2024 बाबत विचारले तर तो पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत दिसतो. मतदान कुणाला करायचे, का करायचे? याबाबत मतदार संभ्रमात दिसताहेत. नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म हवी आहे आणि त्यासाठीचा हा अट्टाहास आहे का? जे सुपात होते ते आज जात्यात आहेत. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या बळजबरीने निवृत्त करण्यामागे 75 वर्षांचा निकष मोदींनी लावला होता. आज मोदी 73 वर्षांचे आहेत त्यामुळे स्वतः च लावलेल्या नियमाप्रमाणे मोदींची ही खासदारकीची शेवटची निवडणूक असावी, त्यामुळे तिसऱ्या टर्म चा अट्टाहास हे सर्व घडवतोय का हा प्रश्न उभा ठाकला आहे. 15 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री व 15 वर्षे देशाचे पंतप्रधान असा 30 वर्षांचा काळ सर्वोच्च पदावर राहिल्याचा तोरा त्यांना आपल्या नावासमोर लावायचा तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

ज्या रोलमध्ये आज अमित शहा आहेत, 2024 नंतर कदाचित त्या जागी दुसरे कुणी असणार का? या चर्चा दिल्लीत वेग धरत आहेत. अमित शहांची तब्येत आजकाल बरी नसल्याचे कारण त्यामागे आहे का आणखी काही वेगळे कारण आहे? 2024 ला जर मोदी तिसरी टर्म मिळविण्यात यशस्वी झाले तर विधानसभेसाठी भाजपचे निवडणूक सूत्र काय असू शकते याबाबत शाश्वती कुणीही देताना दिसत नाही. 2024 साठी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन दोन दावेदार सोबत घेऊन भाजप कोणते वेगळे राजकारण करु इच्छित आहे का? शिवसेना व राष्ट्रवादी फोडून आधी लोकसभा जिंकून मग विधानसभेची रणनीती ठरवणार का? एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांना सोबत घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे करायचे काय? असेल अनेक प्रश्न भाजपसह अनेक विरोधकांना पडलेले आहेत. धक्कातंत्र हे मोदींच्या राजकारणाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यामुळे बरेच विषय गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत का? बघूया 16 अपात्र आमदारांचा निर्णय काय लागतो? त्यानंतर काही पत्ते खुले केले जातात का? बहरहाल 2024 लोकसभेपर्यत आणखीही काही फाटाफूट होऊ शकते असेही भाजपवाले सांगत आहेत. काही विशिष्ट संकेत आहेत की निव्वळ धूळफेक आहे हेही लवकरच कळेल....!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com