पुढील महिन्यात हैद्राबाद येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजप यावर्षी होणाऱ्या गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणार आहेच. पण, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीही रणनीती तयार करणार आहे.
भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबादमध्ये 2-3 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरातून मिळालेल्या प्रतिक्रियांवर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेच्या आधारे भाजपकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत, हे ठरवून रणनीती आखली जाणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीत सुमारे 300 प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. ३ जुलै रोजी मोदी कार्यकारिणीला संबोधित करतील. 3 जुलैच्या संध्याकाळी मोदी हैद्राबादमध्ये रॅली आणि रोड शो देखील करू शकतात.
मागील लोकसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपने पहिल्यांदाच 4 जागा जिंकल्या होत्या. तर हैद्राबाद महापालिका निवडणुकीतही भाजपला चांगले यश मिळाले होते. या कामगिरीने प्रेरित होऊन भाजपला तेलंगणात आपला पाया मजबूत करायचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणी हैद्राबादमध्ये होणार आहे.
काँग्रेसमध्ये चिंतेची लाट
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी 8 जून रोजी ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.
सोनिया गांधी यांना कोरोना झाला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे ही घोषणा काँग्रेस जनांमध्ये चिंतेचे कारण आहे. दुसरीकडे, ईडीने नोटीस बजावल्यानंतरच सोनियांना कोरोना झाल्याचे घोषित करण्यात आले का, अशी भाजपमध्ये चर्चा आहे.