Eyeliner: तुमच्यासाठी कोणतं आयलायनर ठरेल उत्कृष्ट? जाणून घ्या...

Eyeliner: तुमच्यासाठी कोणतं आयलायनर ठरेल उत्कृष्ट? जाणून घ्या...

आयलायनर हे महिलांसाठी आवश्यक मेकअप प्रॉडक्ट पैकी एक आहे.
Published by :
Sakshi Patil
Published on

आयलायनर हे महिलांसाठी आवश्यक मेकअप प्रॉडक्ट पैकी एक आहे. पार्टी असो किंवा अगदी कोणताही कार्यक्रम महिला आवर्जून आयलायनर लावतात. महिलांना आपले डोळे अधिक सुंदर दिसावे असे वाटत असतात आणि आयलायनर हेच काम करतं. तुम्हाला कदाचित एकच लायनर लावायचे माहीत असेल. पण आयलायनरचेही वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यापैकी कोणता प्रकार कसा वापरायचा आणि कोणते आयलायनर वापरणे अधिक सोपे आहे ते जाणून घ्या.

लिक्विड आयलायनर (Liquid Eye Liner)

बऱ्याच महिला लिक्विड आयलायनरचा वापर करतात. लिक्विड आयलायनर ओलं असतं त्यामुळे ते लावल्यानंतर सुकायला थोडा वेळ लागतो. हे आयलायनर ब्रशच्या सहाय्याने आपण डोळ्याला लावतो. हे त्या महिलांसाठी उत्कृष्ट आहे ज्या महिलांना विंग्ड आयलायनर लावायला आवडतं. लिक्विड आयलायनरमध्ये वॉटरप्रूफ आणि नॉन वॉटरप्रूफ असे दोन्ही प्रकार अगदी सहज मिळतात. तुम्हाला लायनर पूर्ण दिवस टिकवून ठेवायचे असेल तर तुमच्यासाठी वॉटरप्रूफ आयलायनरचा पर्याय योग्य ठरतो.

फेल्ट टिप लायनर (Felt Tip Liner)

फेल्ट टिप लायनर एकदम मार्कर पेनाप्रमाणे असतं. यामुळे आयलायनर लावताना जर हात थरथरत असतील तर तुम्हाला फायदा मिळतो. तसेच हे अन्य लायनरच्या तुलनेत लवकर सुकतं. त्यामुळे तुम्ही घाईत असाल आणि आयलायनरचा वापर करायचा असेल तर तुमच्यासाठी हे उत्तम आहे. तुम्ही नवशिके असाल तरीही तुम्हाला यामुळे नीट आयलायनर लावता येईल.

पेन्सिल आयलायनर (Pencil Eyeliner)

पेन्सिल आयलायनर हे बेसिक आयलायनर आहे, जे तुम्ही रोजच्या वापरामध्ये अगदी सहजपणे वापरू शकता. हे एक असे उत्पादन आहे जे पेन्सिलसारखे दिसतं आणि डोळ्यांवर वापर केल्यानंतर सहसा पसरत नाही. तसेच तुम्हाला पेन्सिलप्रमाणे टोक काढून याचा वापर करावा लागतो. ज्या महिलांना लायनर लावता येत नाही त्यांनी पेन्सिल आयलायनरचा वापर करावा. यामध्ये विविध रंगही तुम्हाला बाजारात मिळतात. तुम्हाला वेगवेगळ्या स्टाईल करायच्या असतील तर तुम्ही नक्की या आयलायनरचा वापर करा.

जेल लायनर (Gel Liner)

जेल लायनर हे काजळाच्या डबीप्रमाणेच असतं. टोकदार ब्रशने तुम्ही हे लायनर डोळ्यांवर लाऊ शकता. लहान आणि अगदी पातळ ब्रशचा यासाठी वापर केला जातो. वास्तविक हे लायनर लावणं तसं सोपं आहे. ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे आणि ज्या महिलांना डोळ्यांवर जास्त घाम येत नाही आणि पसरत नाही अशा महिलांसाठी हा पर्याय उत्तम आहे. मात्र तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांनी याचा वापर करू नये कारण हे पटकन पसरतं. मिनिमल मेकअप लुकसाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com