Satara lawyers on Protest
Satara lawyers on Protest

वकीलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वकीलांनी आज केले काम-बंद आंदोलन

Published by :
Vikrant Shinde
Published on

परवा (12-03-2022) रात्री 10:30 च्या दरम्यान राममोहन खारकर हे साताऱ्यातील (Satara) वकील आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना शाहूनगर (Shahunagar, Satara) परिसरात 5-6 इसमांनी रस्त्यात गाडी आडवी लावलेली असल्याने राममोहन ह्यांनी गाडी थांबवून त्या इसमांना मध्ये लावलेली गाडी रस्त्यावरून हटविण्याची विनंती केली. ह्यानंतर त्या इसमांपैकी एकाने लोखंडी गजाने (Steel Rod) वकीलांच्या गाडीची मागील काच फोडली. दरम्यान, गाडीच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून ह्या इसमांपैकी एकजण पीडित वकीलांशी बोलत असताना उजव्या बाजूच्या खिडकीतून दुसऱ्या इसमाने लोखंडी गज वकीलांच्या डोळ्यावर मारला. हा मार इतका जबर होता की, काल पीडित वकीलांचा डोळा काढावा लागला.

वकील राममोहन खारकर यांचे हल्ल्यानंतरचे छायाचित्र

ह्या हल्ल्यानंतर राममोहन यांचे सहकारी वकील 'मन्मथ आठले' ह्यांना 'राममोहन खारकर नंतर आता पुढील नंबर तुझा आहे' असं सांगणारा धमकीचा फोन आला होता. त्यामुळे, पुर्व-वैमनस्यातून संपुर्ण पूर्वतयारीनिशी हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

ह्या घटनेचा निषेध करण्याकरीता आज (14-03-2022) रोजी सातारा जिल्हा बार असोसिएशन (Satara lawyer's bar Association) कडून काम-बंद आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे आज दिवसभरात सातारा जिल्ह्यात एकाही वकिलाने कोर्टात काम केलेलं नाही.

तर, रोजी सातारा जिल्हा बार असोसिएशनने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. ह्या निवेदनामध्ये 'सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास कलम 353 च्या अंतर्गत विशेष अधिकारांखाली गून्हा नोंदविता येतो, तसाच कायदा डॉक्टरांच्या बाबतीतसुद्धा आहे. वकीलांच्या सुरक्षिततेसाठी असे काही प्रयोजन करावे' असं नमूद केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत्यावेळचे छायाचित्र

ह्या घटनेनंतर सर्व आरोपी फरार असून ह्या अज्ञात व्यक्तींविरोधात कलम 3०७ प्रमाणे (खूनाचा प्रयत्न) सातारा शहर पोलिस ठाण्यात (satara city police station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com