Lata Mangeshkar : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; इंदूरमध्ये लतादीदींचा…
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.
अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून लता दिदींना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. लतादीदींची जन्मभूमी इंदूरमध्ये देखिल शोककळा पसरली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहत त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले आहे. यावेळी त्यांनी लतादीदींच्या नावाने संगीत अकादमी आणि विद्यापीठ सुरू करण्यापासून त्यांचा पुतळा उभारण्यापर्यंत अनेक घोषणा देखिल केल्या आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, 'लतादीदींच्या निधनाने कोट्यवधी भारतीयांचे नुकसान झाले, लतादीदींच्या जाण्याने आपल्याही आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून काढता येणार नाही. यासोबतच त्यांनी सांगितले की, इंदूरमध्ये संगीत अकादमी, संगीत विद्यापीठ आणि संगीत संग्रहालय स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री चौहान यांनी केली. संगीत विद्यापीठात मुलांना सुरांचा सराव करता येईल. तर, त्यांची सर्व गाणी संग्रहालयात उपलब्ध असतील.