उत्तराखंड हिमस्खलन : मृतांना प्रत्येकी चार लाखांची मदत, बचावकार्य सुरू
लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमस्खलन झाल्याने मोठी नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. रैनी गावातील जोशी मठ परिसरात ही दुर्घटना घडली. सकाळपासून या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ दलासोबतच पोलीस यंत्रणाही सक्रिय झाली होती. मोठ्या प्रमाणात बचावकार्य हाती घेण्यात आले.
अखेर यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दुर्घटनेत जवळपास १२५ लोक बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सात मृतदेह सापडल्याची माहिती त्यांनी दिली. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती रावत यांनी दिली.
एनडीआरफची स्पेशल टीम दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, असे ते म्हणाले. आतापर्यंत आयटीबीपीच्या टीमला तपोवनच्या एका भुयारातून १६ लोकांना जीवंत काढण्यात यश मिळालं आहे. सध्या या ठिकाणी २५० जवानांच्या तीन टीम बचावकार्यात गुंतलेल्या आहेत.
चमोलीत ९ – १० मृतदेह बाहेर काढण्यात यश
चमोलीतील दुर्घटनेत अद्याप ९ ते १० मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. बचावकार्यादरम्यान तपोवनच्या बांधापाशी एका टनलमध्ये बांधकाम सुरू होतं. त्या ठिकाणी काही जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.
दरम्यान, भूस्खलनानंतर निर्माण झालेल्या जलप्रलयाचा नदीकाठांवरील गावांना मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत असून, ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टची मोठी हानी झाली आहे. सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्यांना मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आलं असून, हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने काठावर असलेल्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.