शेतकरी आंदोलनाच्या आड खलिस्तान समर्थकांचा ‘हा’ डाव’?
नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा फायदा खलिस्तान समर्थक घेण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होती. पण भारतीय गुप्तचर यंत्रणांना यासंबंधीचे धागेदोरे हाती लागले असून खलिस्तान समर्थकाचा एक डाव उघड झाला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांसमवेत केंद्र सरकारच्या चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या आहेत. पण कृषी कायद्यांबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ताणलेल्या परिस्थितीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न खलिस्तान कमांडो फोर्स (केसीएफ) ही दहशतवादी संघटनेचा आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वीच यासंबंधीचा एक अहवाल तयार केला आहे.
पूर्वी पंजाबमधून खलिस्तान समर्थकांचे समूळ उच्चाटन करण्यात कथित सहभाग असलेला एका शेतकरी नेत्याच्या हत्येचा कट केसीएफने रचला आहे. जेणेकरून या हत्येनंतर देशभरात हिंसाचार होईल, तसेच या हत्येसाठी सरकारी यंत्रणा किंवा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरे जाईल, असा दावा गुप्तचर यंत्रणांनी केला असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच हा कट रचणारे बेल्जियम आणि यूकेत असल्याची माहिती आहे.
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याजवळ शेतकरी जमले होते तेव्हा वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान समर्थकांनी निदर्शने केली होती. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण येथे जमल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच, त्यांच्यापैकी काही जणांकडे कथित खलिस्तानचे झेंडे होते, असे सांगितले जाते.