जपानमध्ये दुषित मात्रांमुळे मॉडर्ना लशीचा वापर स्थगित
मॉडर्ना लशींच्या न वापरलेल्या कुप्या दूषित असल्याचे आढळल्यानंतर जपानने या लशीच्या १० लाखांहून अधिक मात्रांचा वापर स्थगित केला आहे. यामुळे एकीकडे कोरोनाचा फैलाव वाढला असताना लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू असताना देशात लशींची टंचाई भासणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
अनेक लसीकरण केंद्रांवर या प्रदूषणाच्या प्रकाराची नोंद झाल्याचे तेथील आरोग्य मंत्रालयाने सांगितले. यापैकी काही मात्रा देण्यात आल्या असाव्यात, मात्र आतापर्यंत कुठलेही विपरीत परिणाम झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारी म्हणून, एकाच बॅचमध्ये उत्पादन करण्यात आलेल्या मात्रांचा वापर स्थगित करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे मॉडर्ना लशीच्या जपानमधील विक्री आणि वितरणाची जबाबदारी असलेल्या ताकेदा फार्मास्युटिकल्स या जपानी औषध उत्पादक कंपनीने सांगितले.
या प्रकरणी तातडीने तपास करण्याबाबत मॉडर्नाला सांगतानाच, स्पेनमध्ये उत्पादन करण्यात आलेल्या लशी वापरणे थांबवावे, अशी सूचना या कंपनीने वैद्यकीय संस्थांना केली.
दरम्यान, भारतात शुक्रवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आज उच्चांक गाठण्यात आला. एका दिवसात सर्वाधिक १ कोटी डोस देण्यात आले. आतापर्यंत देशाच्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येला किमान एक डोस देण्यात आला आहे.
केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असून दररोज एक कोटी डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी आरोग्य यंत्रणांना हे लक्ष्य गाठण्यात यश आले. शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २८ लाख डोस देण्यात आले, तर त्याखालोखाल महाराष्ट्रात ९ लाख ९० हजार डोस देण्यात आले.