भारत आणि चीन सीमावादावर समेट ; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा
लोकशाही न्यूज नेटवर्क
काही महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर चालत असलेल्या वाद चिघळत असतानाच भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये समेट झाली असून, परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतले जात आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. यावेळी भारताची एक इंच जमीनही कोणत्याही देशाला मिळू देणार नाही असे सूचक विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केले आहे.
चीनबरोबर पेँगॉंगजवळील सैन्य तुकड्या दोन्ही देशांनी मागे घेण्याबाबत करार झाल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. चीनशी अनेक पातळ्यांवर चर्चा सुरू असून आपसातील सहकार्यानुसार सर्व निर्णय घेतले जातील. चीनशी बोलणी करताना भारताने काही मुद्दे अग्रक्रमाने ठेवले आहेत. त्यात एलएसीचा आदर दोन्ही देशांनी करावा, जैसे थे स्थितीत एका बाजूने बदल करू नये, सर्व समझोत्यांचं चीन आणि भारत दोन्ही देशांनी पालन करावं हे तीन मुद्दे आम्ही ठळकपणे मांडल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितले.