Income Tax Portal Issue | इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना समन्स
आयकर विभागाच्या नवीन पोर्टलवरील अडचणी दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे अर्थ मंत्रालयाने देशातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना समन्स बजावले आहे. त्यांना पोर्टलमध्ये येत असलेल्या दोषांबाबत माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. आयकर विभागाचे नवे पोर्टल इन्फोसिसनेच तयार केले आहे. कंपनीला २०१९ मध्ये याचे कंत्राट दिले होते. तिला आयकर भरणा करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन सिस्टिम विकसित करण्यास सांगण्यात आले होते.
यामागील उद्देश म्हणजे रिटर्नच्या तपासणीचा कालावधी ६३ वरून घटवून एक दिवस करणे आणि रिफंड प्रक्रिया गतिमान करणे हा होता. सात जून रोजी मोठा गाजावाजा करून आयकर पोर्टलची सुरुवात करण्यात आली होती. परंतु सुरुवातीपासूनच या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २२ जून रोजी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली हाेती. त्यानंतर आता पाठवलेल्या समन्समध्ये म्हटले की, पारेख यांनी २३ ऑगस्टपर्यंत अर्थमंत्र्यांना याचे उत्तर द्यावे. अडीच महिन्यांनंतरही ई-फायलिंगमध्ये का गडबड होत आहे हे सांगावे.