कंदहार अपहरण प्रकरणाच्या वेळी ममता बॅनर्जी वाजपेयींना म्हणाल्या…
कंदहार विमान अपहरण प्रकरणात तत्कालीन वाजपेयी सरकारने अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी केल्या होत्या. त्यावेळी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्या विमानातील प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी केंद्र सरकारसमोर प्रस्ताव ठेवला होता. त्याची माहिती ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी दिली.
पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि कट्टर मोदीविरोधक यशवंत सिन्हा यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी विद्यमान भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 1999 साली कंदहार विमान अपहरणाच्या वेळी घडलेला एक प्रसंगही सांगितला.
इंडियन एअरलाइन्सचे आय.सी. 814 हे विमान 24 डिसेंबर 1999 रोजी नेपाळच्या काठमांडू येथून दिल्लीला येत असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर नेण्यात आले. या विमानात 191 प्रवासी व क्रू मेंबर होते. त्यांनी या प्रवाशांना सोडण्यासाठी मसूद अझहरसह तीन दहशतवाद्यांच्या सुटकेसह इतर काही मागण्या करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी प्रवाशांच्या सुटकेसाठी स्वत: ओलिस राहण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी त्या स्वत:चा जीवही धोक्यात टाकण्यासाठी तयार होत्या, असे यशवंत सिन्हा म्हणाले.