आपल्याला अडकविण्यासाठी टीआरपी घोटाळ्याचे षडयंत्र, अर्णब गोस्वामी यांचा हायकोर्टात दावा
टीआरपी घोटाळ्याची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात झाली. आपल्याला अडकविण्यासाठी टीआरपी घोटाळ्याचे षडयंत्र रचण्यात आले, असा दावा ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी यावेळी केला. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता उद्या होणार आहे.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात एआरजी आऊटलाअर कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयात या याचिकेसह अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.
पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हेतू शुद्ध नव्हता. रिपब्लिक टीव्ही आणि संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसतानाही त्यांना आरोपी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, असे रिपब्लिक टीव्हीच्या वकिलाने सांगितले. या घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करीत होते आणि त्यांना अन्य एका प्रकरणात निलंबित केल असल्याचे वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रसारमाध्यमांशी बोलणे ही पोलिसांची जबाबदारी आहे का? अशी कोणती गोष्ट आहे की, ज्यामुळे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली? असे प्रश्न न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पिटले यांनी केले.