येत्या पाच दिवसात महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात अतिमुसळधार पाऊस
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या चार दिवसात महाराष्ट्र, गोव्यासह सहा राज्यांच्या किमान भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यावेळी विजांसह ढगांचा गडगडाट झाला. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. पुण्यासह ठाणे आणि घाट परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे.
दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथील माहे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागात 9 ऑक्टोबरला देखील मुसळधार पाऊस पडू शकतो. या राज्यांव्यतिरिक्त, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही 10 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यंदा मुंबईसह राज्यांतील अनेक भागांना मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. चिपळूण, महाडसारख्या ठिकाणी पूरस्थितीमुळे दरडी कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने धुमशान घातले होते. गणेशोत्सवानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाने धुमशान घालण्यास सुरुवात केली आहे.