शरीरातील नैसर्गिक वेग म्हणजे काय? जाणून घ्या वेगाचे 13 प्रकार
आयुर्वेद हे एकमेव असं वैद्यकशास्त्र आहे की जे आरोग्याचं रक्षण व्हावं आणि रोग होऊ नये याचं मार्गदर्शन करतं. म्हणूनच आयुर्वेद ही केवळ एक पथ्य नाही तर जीवनपद्धती आहे. वेग ही एक संकल्पना आयुर्वेदात सांगितलेली आहे. शरीरात जाणवणारे नैसर्गिक वेग म्हणजे वेग. उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर विष्ठासाठी जाण्याची भावना होणं हा एक वेग आहे. दिवसातून तीन-चार वेळा युराईनसाठी जावं लागणं हा एक वेग आहे. अगदी शिंका येणं, जांभई येणं हे सुद्धा वेगच आहेत.
असे एकूण 13 वेग आयुर्वेदात सांगितलेले आहेत आणि या सर्व वेगांना आवरून धरणं किंवा त्यांना जबरदस्तीनी प्रवृत्त करणं या दोन्ही गोष्टी रोगाला आमंत्रण देणाऱ्या असतात असंही सांगितलेलं आहे. सकाळी उठल्यावर विष्ठाचा आपोआप आवेग येणं हे आरोग्य चांगलं असल्याचं एक लक्षण तर असतंच, पण जर चुकीच्या खाण्यापिण्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे एखाद्या दिवशी हा आवेग आला नाही तर जबरदस्तीने विष्ठाला जाऊन कुंथणं म्हणजे त्या वेगाला प्रवृत्त करणं असतं आणि आयुर्वेदानुसार ते चुकीचं असतं.
तसंच एखाद्या दिवशी सकाळी लवकर घराबाहेर पडावं लागलं आणि निघण्यापूर्वी पोट साफ झालं नाही. मात्र नेहमीच्या वेळेला विष्ठाला जाण्याची जेव्हा भावना झाली, तेव्हा सोय नसल्यानी तो वेग धरून ठेवावा लागला तर ते सुद्धा चुकीचं असतं. युराईनच्या बाबतीत तर वेग धारण आणि वेगाला प्रवृत्त करणं हे अगदी सर्रास केलं जातं. कधीपासून वाशरुमला जायचं होतं पण कामाच्या गडबडीत विसरूनच गेलो, हे वाक्य अनेकांच्या तोंडी असतं किंवा त्याहीपेक्षा, घरातून बाहेर पडताना उगाचंच वाटेत थांबायला लागू नये म्हणून भावना नसतानाही वाशरुमला जाउन येण्याची सवयही अनेकांना असते. आयुर्वेदात या दोन्ही सवयी रोगाला आमंत्रण देणाऱ्या सांगितलेल्या आहेत. वेगाची भावना झाली की तो अडवून ठेवू नये आणि भावना नसताना त्याला जबरदस्तीनी प्रवृत्त सुद्धा करू नये.
रोगाः सर्वेपि जायन्ते वेगोदीरण धारणैः
अष्टांग हृदयातलं हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवायला हवं. याचा अर्थ आहे, वेगाला बळेच प्रवृत्त करण्यानी आणि वेगाला अडवून ठेवण्यानीच सर्व प्रकारचे रोग होतात. एकूण तेरा वेग आहेत. गॅस, विष्ठा, युराईन, तहान, भूक, झोप, शिंक, श्रमश्वास म्हणजे श्रमामुळे लागणारा दम, जांभई, अश्रू, उलटी आणि स्खलन आरोग्याचे रक्षण करायचं असेल तर या 13 वेगांना अडवून ठेवू नये किंवा जबरदस्तीने प्रवृत्तही करू नये.