Health: आरोग्य नीट राहण्यासाठी करा काही सोपे उपाय; जाणून घ्या...
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
एक परिपूर्ण आरोग्य शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदात औषधोपचार तर आहेतच पण आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय करावयाचंही मार्गदर्शन आहे. आयुर्वेदाचा सराव करताना एक प्रश्न हमखास विचारला जातो की डॉक्टर, काय खावं, काय न खावं, हे तर तुम्ही सांगितलं. पण किती खायचं हे कसं ठरवायचं?
हा प्रश्न महत्त्वाचा तर नक्कीच आहे, पण याचं उत्तर डॉक्टर नाही, तर आपलं आपल्यालाच शोधावं लागतं. भारतीय संस्कृतीमध्ये आपण नेहमी म्हणतो, जेवत असताना कोणी किती पोळ्या घेतल्या, कोणी किती भात खाल्ला हे पाहु नये किंवा मोजूही नये. यामागे फक्त चांगले शिष्टाचार इतकंच कारण नाही तर आयुर्वेदाचं शास्त्रही आहे. कारण आयुर्वेदात सांगितलेलं आहे, आहाराचं प्रमाण अग्नी सापेक्ष असावं.
वय, ऋतुमान, कामाचं स्वरूप, देश इतकंच नाही तर, मनस्थितीचाही आपल्या अग्नीवर परिणाम होत असतो आणि त्यानुसार भूक कमी जास्त होत असते. त्यामुळे जितकी भूक लागली असेल, तितकच खावं. आयुर्वेदात म्हटलेलं आहे, भुकेच्या प्रमाणानुसार पोटाचे चार भाग कल्पना करावेत. यातले दोन भाग घन अन्नानी आणि म्हणजे भात, भाजी, पोळी यांनी भरावे, एक भाग द्रव अन्नानी, म्हणजे आमटी, कढी, ताक, पाणी यांनी भरावा आणि उरलेला एक भाग? उरलेला एक भाग चक्क रिकामा ठेवावा. कल्पना करा, मिक्सरमध्ये एखादी गोष्ट जेव्हा बारीक करायची असते, तेव्हा आपण काय करतो? वरचा काही भाग रिकामा ठेवतो, बरोबर? कारण तरच मिक्सरमधल्या गोष्टी नीट एकजीव होऊन बारीक होऊ शकतात. त्याचप्रमाणे खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होण्यासाठी पोटात चर्वणाची जी क्रिया होणं आवश्यक असतं, त्यासाठी पोटाचा पाव भाग रिकामा राहणं आवश्यक असतं.
पाहुणे आले की, आपण आग्रहानी जेवण वाढतो हे खरं, पण बरोबरीनी,‘सावकाश होऊ द्या’ असंही सांगतो. सावकाशचा आयुर्वेदिक अर्थ आहे, स - अवकाश. म्हणजे नीट जेवा, भूकेचं समाधान होईल तितकं व्यवस्थित जेवा, पण नंतर ते अंगी लागण्यासाठी थोडा अवकाश, थोडी रिकामी जागा पोटात राहू द्या. आरोग्य नीट राहण्यासाठी असेच साधे पण अतिशय तार्किक नियम आहेत.