मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईत डेंग्यू आणि हिवतापाचा प्रादुर्भाव; रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईत डेंग्यू आणि हिवतापाचा प्रादुर्भाव; रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईत सप्टेंबरमध्ये अधूनमधून कोसळलेला मुसळधार पाऊस आणि कडाक्याचे उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले होते.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मुंबईत सप्टेंबरमध्ये अधूनमधून कोसळलेला मुसळधार पाऊस आणि कडाक्याचे उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले होते. बदलत्या वातावरणामुळे मुंबईमध्ये सप्टेंबरमध्ये हिवताप व डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम आहे. सप्टेंबरमध्ये हिवतापाचे 1 हजार 261 रुग्ण, तर डेंग्यूचे 1 हजार 456 रुग्ण आढळलेत. ऑगस्टच्या तुलनेत हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र अन्य चिकुनगुन्या, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ, स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.

सप्टेंबर सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मात्र त्यानंतर पडणाऱ्या कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. ऊन-पावसाच्या खेळामुळे डासांच्या उत्पत्तीस अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. मुंबईत सप्टेंबरमध्ये वातावरण बदलामुळे हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून सप्टेंबरमध्ये हिवताचाचे 1 हजार 261, तर डेंग्यूचे 1 हजार 456 रुग्ण सापडले आहेत.

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये हिवतापाचे 1 हजार 171आणि डेंग्यूचे 1 हजार 13 रुग्ण सापडले होते. हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असली तरी अन्य साथीच्या आजारांमध्ये मात्र लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास येते. मुंबईत सप्टेंबरमध्ये चिकुनगुन्याचे 156, लेप्टो 75, गॅस्ट्रो 466, कावीळ 129, स्वाईन फ्ल्यूचे 62 रुग्ण सापडले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com