गर्भधारणा आणि गर्भसंस्काराचे महत्त्व
वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री
गर्भसंस्कारातला एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे गर्भधारणा नैसर्गिक झालेली असणं. वंध्यत्व (infertility) ही सध्या दिवसेंदिवस वाढणारी समस्या. यामागे लग्नाला होणारा उशीर, आधी शिक्षण, नंतर करियर च्या निमित्तानी आरोग्याकडे झालेलं दुर्लक्ष, वेळी अवेळी होणारी जेवणं, रात्रीची भलतीच जागरणं, भलताच ताण,स्त्रियांच्या बाबतीत हार्मोनल असंतुलन अशी अनेक कारणं असू शकतात.
इतर कोणत्याही रोगाप्रमाणे वंध्यत्वामध्ये सुद्धा मूळ कारण दूर होणं खूप गरजेचं असतं. कारण तसंच ठेवलं आणि फक्त प्रगत तंत्रज्ञ्यानाच्या मदतीनी गर्भधारणासाठी प्रयत्न केले गेले, आणि त्यातून जरी गर्भधारणा झाली तरी या प्रक्रियेमध्ये आई आणि बाळाचं आरोग्य तडजोड झाल्याशिवाय राहत नाही हे सुद्धा खरं. म्हणूनच तर एका बाजूनी तंत्रज्ञ्यानाची मदत घेऊन गर्भधारण होण्याचं प्रमाण वाढतंय पण दुसऱ्या बाजूनी स्त्रियांमधे हार्मोनल असंतुलन आणि मुलांमध्ये अतिक्रियाशीलता, आत्मकेंद्रीपणा, delayed mile stones वगैरे तक्रारींचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय.
एक जीव जन्माला घालणं ही प्रत्येक दाम्पत्यावर असलेली सर्वात मोठी जबाबदारी आहे. आपल्या मुलीनी किंवा मुलानी आपल्यापेक्षाही यशस्वी व्हावं अशी इच्छा कोणत्या आई-वडिलांची नसते? आणि या प्रक्रियेचा श्री गणेशागर्भसंस्कारातूनच होत असतो.
श्रीरामांच्या स्वागतासाठी शबरीनीजसं प्रत्येक बोर चाखून पाहिलं, गोड बोर तेवढीतीनी ठेवली आणि आंबट बोरं फेकून दिली त्याप्रमाणे आपणही आपल्या बाळाला आपले, आपल्या घराण्यातले गुणच देऊया, चांगले संस्कारच देऊया. आपल्या बाळापर्यंत आपल्यातले दोष जाणार नाही याची काळजी घेऊया असा प्रत्येक जोडप्याने विचार केला तर घराघरात श्रीराम किंवा सीतामाई सारखं आदर्श अप्रत्य जन्माला येईल आणि पुन्हा एकदा संस्कार संपन्न, नव्हेगर्भसंस्कार संपन्न समाजाचा उदय होईल हे नक्की.