हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या लाडूची रेसिपी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
आजकाल गोड खाण्याचे म्हटलं की पहिला प्रश्न येतो की डायबिटीस असणाऱ्यांना चालेल का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हो. डायबिटीस असला तरी घरी बनवलेला मुगाचा लाडू, छोटा असेल तर अख्खा आणि मोठा असेल तर अर्धा या प्रमाणात खाल्लेला चालतो.
मुळात मूग हे वात पित्त शामक आणि अत्यंत पथ्यकर असतात. सर्व रोगात, सर्व प्रकृतीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असतात. शिवाय लाडू बनवताना वापरलेलं तूप जर साजूक असेल, म्हणजेच आयुर्वेदिक पद्धतीनी आणि घरी बनवलेलं असेल, तर ते सुद्धा त्रिदोष शामक आणि सगळ्यांसाठी अमृतासारखं असतं.
एक कप मुगाची डाळ आधी पाण्याने धुऊन आणि वाळवून घ्यावी. कढईत मंद आचेवर छान गुलाबीसर आणि खमंग होईपर्यंत भाजून घ्यावी. थंड झाली की मिक्सरमध्ये बारीक करावी. आता कढईत अर्धा कप तूप घ्यावं. यातील दोन तीन चमचे तूप नंतर साठी वेगळं काढून घ्यावं. तूप गरम झालं की त्यात थोडं थोडं भाजलेल्या मुगाचं पीठ मिसळून एकजीव मिश्रण तयार करावं.
एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढावं, त्यात पाऊण कप बारीक केलेली खडीसाखर मिसळावी. छान एकजीव मिश्रण तयार झालं की आवश्यकतेनुसार हाताला तूप लावून त्याचे लाडू वळवून ठेवावे. मूगाचे लाडू प्रवासात कायम बरोबर असावेत. वेळी अवेळी भूक लागली किंवा जेवायला उशीर झाला तर एखादा जरी मुगाचा लाडू खाल्ला तरी पोटाला छान आधार मिळतो. प्रवासात गाडी लागणाऱ्यांसाठी सुद्धा मुगाचा लाडू औषधाप्रमाणे कामी येतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी, सर्व प्रकृतीच्या व्यक्तींसाठी हे मुगाचे लाडू उत्तम असतात आणि हो, डायबिटीस असला तरी अर्धा लाडू खाल्ला तर नक्की चालतो.