Healthcare: रोजच्या वापरातील वनस्पतीचा हा आहे निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी फायदा; जाणून घ्या...
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
मसाल्याच्या डब्यात जे अगदी शंभर टक्के असतंच ते म्हणजे जिरे. ज्याच्या सेवनाने अन्न जिरे तेच जिरे. खरोखरच अन्नपचन नीट होण्यासाठी जिऱ्याचा अप्रतिम उपयोग होताना दिसतो. अन्न अंगी लागणं असं जे आपण म्हणतो, त्यासाठी जिरं उपयोगी पडतं. ज्यांना काहीही खाल्ल्यानंतर शौचाला जावं लागतं, सहसा अर्ध घन ते सैल गती होते, कधी कधी तर अन्नांशतसाच्या तसा शौचावाटे निघून जातो अशा वेळेला जीरं औषधाप्रमाणे उपयोगी पडतं.
जिरं मंद आचेवर थोडसं भाजून घ्यावं, खलबत्ता किंवा मिक्सरच्या मदतीनी त्याची पूड करावी. जेवणाच्या सुरुवातीलाही पूड एक चमचा या प्रमाणात कोमट पाण्यासह किंवा ताज्या आणि लोणी काढून टाकलेल्या ताकासह घ्यावी. यामुळे आतड्याची शक्ती वाढते, अन्न जिरण्यास मदत मिळते. फोडणीसाठी तूप वापरायचं असेल तेव्हा त्यात फक्त जीरंच टाकण्याची पद्धत असते. कारण तुपाचा उकळता बिंदू हा तेलापेक्षा बराच कमी असतो आणि मोहरीच्या तुलनेत जिरं मऊ असल्यामुळे ते पटकन तडतडतं. जिऱ्याच्या ऐवजी किंवा बरोबरीनी मोहरी टाकली तर ती तडतडेपर्यंत तूप आवश्यकतेपेक्षा जास्त गरम होतं आणि मग त्यातली संवेदनशील तत्व जळून जातात, त्यामुळे तुपाच्या फोडणीमध्ये फक्त जिरं टाकणंच श्रेयस्कर असतं.
पचन मंदावलेलं असेल, भूक विशेष लागत नसेल किंवा अपचनामुळे गॅस होत असतील तर भाजी, आमटी बनवताना तूप आणि जिऱ्याची फोडणी देणं उत्तम असतं. गॅस , पोटात जडपणा, गॅसच्या दबावामुळे अस्वस्थ होत असेल तर भाजलेले जिरं, बडीशोप आणि भाजलेला ओवा समप्रमाणामध्ये आणि चवीनुसार सेंधव एकत्र करावं आणि जेवणानंतर नीट चावून खावं. काही दिवस नियमितपणे हा उपाय केला तर त्यामुळे नक्की गुण येतो. रोजच्या वापरातील अशाच गुणकारी ववस्पतींचे औषधी गुणधर्म जाणून घेण्यासाठी पहात रहा….