पंचामृतसोबतच बदाम खाणं आहे आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या...
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
दिवसाची सुरुवात पंचामृताने झाली की त्याची शक्ती आपल्याला दिवसभर पुरते. पूर्वी आपल्याकडे रोज नैवेद्य म्हणून पंचामृत दाखवण्याची पद्धत होती. त्या निमित्ताने घरातले सगळेजण ते आपोआप घेत असत. अर्थात परमेश्वर आपल्या शरीरातही आहेच. त्यामुळे सध्या नैवेद्य दाखवला नाही तरी रोज सकाळी घरातल्या सगळ्यांनी पंचामृत अगदी अवश्य घ्यावं.
अहं ब्रह्मास्मि हे जे भारतीय तत्त्वज्ञान आहे. आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर त्यात सर्वप्रथम येतो मेंदू कारण आपले विचार, आपल्यातली सर्जनशीलता, आपलं व्यक्तिमत्व हीच तर आपली खरी ओळख असते. पंचामृत बुद्धी, स्मृतीसाठी सर्वोत्तम आहेच, त्याच्या बरोबरीने रोज सकाळी 4-5 बदाम खाणंही चांगलं. बदाम कसे खायचे याचेही काही नियम आहेत.
एक तर चांगल्या क्वालिटीचे बदाम आणावेत. ते रात्रभर पाण्यात भिजत घालावे आणि सकाळी वरची साल काढून खावे. पण बदाम घाई घाईने खाऊन चालत नाही बर का. आपण जेव्हा बाळाला बाळगुटीत बदाम देतो, तेव्हा तो जसा सहाणेवर उगाळून देतो, तसे बदाम खाताना ते नीट चावून चावून त्याची पेस्ट करून खाल्ले तरच ते अंगी लागतात.
बदाम हे मज्जा धातूला पोषक म्हणजे मेंदू आणि नसा अर्थात संपूर्ण मज्जासंस्थासाठी उपयोगी असतात. बारा महिने रोज सकाळी 4 ते 5 बदाम खाण्यानी प्रतिकार शक्ती सुधारते, शरीराला योग्य स्निग्धता मिळते, शरीरातलं फक्त चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं, बाकी कोलेस्ट्रॉल आटोक्यात राहतं.