मासिक पाळीत चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; जाणून घ्या...
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
पाळी उशिरा येणं, अंगावरून कमी जाणं आणि चेहऱ्यावर काळे डाग येणं या गोष्टी वेगवेगळ्या नाहीत बरं का. स्त्रीचा हार्मोनल संतुलन हा तिच्या आरोग्याला, सौंदर्याला, इतकच नाही तर मानसिकतेला सुद्धा कारणीभूत असतो. हार्मोन्सचा बिघडलेला तोल पुन्हा संतुलनात आणला की या दोन्ही तक्रारी एकत्रच दूर होतील. यासाठी घरच्या घरी एक उपाय करता येईल.
एक चमचा अनंतमूळ आणि अर्धा चमचा मंजिष्ठायांची अर्धवट कुटलेली भरड रात्रभर पाण्यात भिजवावी आणि सकाळी हे पाणी गाळून घेऊन प्यावं. याशिवाय कुमारी आसव म्हणून एक औषध मिळतं, ते दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर दोन दोन चमचे, त्यात समभाग पाणी मिसळून घ्यावं. रोज सकाळी वीस मिनिटांसाठी चालायला जाणं, सूर्यनमस्कारासारखं सोपंयोगासन करणं हे सुद्धा चांगलं. या उपायांमुळे दोन महिन्यात फरक जाणवेलच आणि अन्यथा आयुर्वेदिक वैद्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणं उत्तम.
चेहऱ्यावरच्या काळ्या डागांसाठी अजून एक साधा उपाय करून पाहा. आपल्या घरामध्ये सहाण असतेच. सहाणेवर थोडा लिंबाचा रस घ्यावा, त्यात जायफळ उगाळून त्याची पेस्ट तयार करावी आणि ही पेस्ट काळ्या डागांवर 15-20 मिनिटांसाठी लावून ठेवावी, नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावी.