Rugular Periods Home Remedy: नियमित मासिक पाळीसाठी करा घरच्याघरी 'हे' उपाय
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
हार्मोनल संतुलनचा आपल्या हातातला आरसा म्हणजे मासिक पाळी. साधारण वयाच्या 13 व्या वर्षापासून ते 45-50 वर्षांपर्यंत दर महिन्याला असतं. खरं तर दर 28 दिवसांनी पाळी येणं अपेक्षित असतं. आयुर्वेदात ही प्रक्रिया रसधातूच्या आधीन असते असं सांगितलं आहे. 28 दिवसच का? तर रसधातू म्हणजे शरीरातील जलतत्त्व. आणि जलतत्त्वाचा अधिपती म्हणजे चंद्र. समुद्राला भरती कधी येईल, ओहोटी कधी लागेल? हे जसं आपण तिथीवरून म्हणजे चंद्राच्या स्थितीवरून सांगू शकतो, तसाच आपल्या शरीरातील रसधातूवरही चंद्राचा प्रभाव असल्यामुळे एक चंद्र चक्र म्हणजेच 28 दिवसांनी पाळी येत असते.
यात 1-2 दिवस पुढे मागे झालं तरी चालू शकतं. पण एकदम आठ - पंधरा दिवसांचा फरक पडणं किंवा मधला एखादा महिना पाळी न येणं, 2-3 महिन्यांनी कधीतरी पाळी येणं, असं होत असेल तर तातडीनी आयुर्वेदाचे उपचार सुरू करायला हवेत.
नियमित मासिक पाळीसाठी घरच्या घरी करता येतील असे 3 साधे उपाय म्हणजे, सकाळी चमचाभर ताजा कोरफडीचा गर घेणं. जेवणानंतर कुमारी आसव घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉर्मोन्सवर काम करायचं असेल तर योगाला पर्याय नाही. त्यामुळे रोज कमीत कमी बटरफ्लाय हे योगासन, 10 ते 12 सूर्यनमस्कार आणि 20 मिनिटांसाठी चालायला जाणं हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं.