हाफकिनला कोव्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी १५९ कोटी अनुदान
देशात कोरोना लसीकरण मोहीमेवर भर देण्यात येत आहे. परंतु भारतातील लोकसंख्या पाहता कोरोना लसी पुरवठा कमी पडत आहे. लसीकरण मोहिमेमध्ये अडथळा निर्माण होताना दिसतो. परंतु हे अडथळे लवकरच दूर होणार आहेत. मुंबईस्थित हाफकिन बायो फार्मास्युटीकल कॉर्पोरेशन लिमिटेडला कोरोनावरील कोव्हॅक्सिन लसीचे एका वर्षात २२.८ कोटी डोस तयार करण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी हाफकिनला १५९ कोटीचे अनुदान दिले आहे. हे उत्पादन मुंबईतील परेल कॉम्प्लेक्समधील कंपनीत करण्यात येणार आहे.
कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्माला देण्यात येणाऱ्या एकूण अनुदानात केंद्र सरकारकडून ६५ कोटी तर महाराष्ट्र सरकारकडून ९४ कोटी रुपयांचा वाटा आहे. कंपनीला लसनिर्मितीसाठी ८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. लस उत्पादनासाठी दोन टप्पे निश्चित केलेत. लस निर्मितीसाठी आवश्यक औषधांची निर्मिती आणि त्यानंतर लस निर्मिती असे दोन टप्पे असणार आहे, अशी माहिती हाफकीन बायोफार्मा कंपनीकडून देण्यात आली.