Good News | एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात
कोरोना महामारीच्या काळात सर्वच जण आर्थिक अडचणीत असताना आता एक सुखद गोष्ट समोर येत आहे. पेट्रोल, डिझेलसोबतच गेल्या काही महिन्यांत एलपीजी सिलिंडरचे दरदेखील गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. मात्र उद्यापासून सिलिंडरच्या दरात कपात होणार आहे. इंडियल ऑईल कॉर्पोरेशननं याबद्दलची माहिती दिली आहे.
उद्यापासून सिलिंडरच्या दरात १० रुपयांनी कपात होणार आहे. सिलिंडरचे नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याचं इंडियल ऑईल कॉर्पोरेशननं सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरातही घसरण होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या १४.३ किलोग्रॅमच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी मुंबईत ८१९ रुपये मोजावे लागतात. दिल्लीतही सिलिंडरचा दर इतकाच आहे. तर कोलकात्यात सिलिंडरसाठी ८४५.५० रुपये, चेन्नईत ८३५ रुपये मोजावे लागतात. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं सिलिंडरच्या दरात कपात केल्यानं उद्यापासून मुंबई, दिल्लीत सिलिंडर ८०९ रुपयांना मिळेल. तर कोलकात्यात ८३५.५० रुपयांना आणि चेन्नईत ८२५ रुपयांना मिळेल.