जीडीपीचा दर वाढला मात्र…
2021-22 या आर्थिक वर्षात जून महिन्यात संपणाऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे हे संकेत आहेत. मात्र, जीडीपीचे आकडे समाधानकारक असले तरी अजूनही अर्थव्यवस्था कोरोनाच्या फटक्यातून सावरलेली नाही. अजूनही अर्थव्यवस्थेला गती आलेली नाही. देशाची अर्थव्यवस्था तिमाहीच्या आकडेवारीनुसार अजूनही चार वर्षे मागे आहे.
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीमध्ये 20.1 टक्के वाढ झाली आहे. जीडीपीत झालेल्या या वाढीमुळे अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्यावर्षी याच तिमाहीत उणे 23.9 टक्के जीडीपी नोंदवण्यात आला होता. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी जीडीपी ढासळला होता.
कोरोनाच्या आधीच्या काळाशी तुलना केल्यास 2019-20 च्या एप्रिल ते जून या तिमाहीपेक्षा जीडीपी दर 9.2 टक्क्यांनी कमी आहे. या तिमाहीत 35.66 लाख कोटींचा जीडीपी होता. तर आताचा जीडीपी 32.38 लाख कोटी आहे. म्हणजेच दोन वर्षांच्या तुलनेत जीडीपी 9 टक्क्यांनी कमी आहे. कोरोनाच्या आधी मार्च 2021 च्या तिमाहीत 38.96 लाख कोटींचा जीडीपी होता. त्या तुलनेत हा जीडीपी 17 टक्क्यांनी कमी आहे.