गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा आमदार असणाऱ्या गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गंभीरनेच यासंदर्भातील तक्रार पोलिसांकडे केल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. गंभीरने तक्रार केल्याचा खुलासा पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.
दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीरने जीवे मारण्याची धमकी आल्यासंदर्भात तक्रार नोंदवलीय. "भाजपाचे पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये आम्ही तपास करत आहोत. तसेच गौतम गंभीर यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा आम्ही वाढवली आहे," असं श्वेता यांनी सांगितलं.
गंभीरच्या कार्यालयामधून यासंदर्भातील एक पत्र पोलिसांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रामधील मजकुरानुसार गंभीरला त्याच्या ई-मेलवरुन ही धमकी देण्यात आलीये. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी आलेल्या एका ई-मेलमध्ये खसदार गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून तपास करावा, असं पत्रात म्हटलं आहे.