अमेरिकेत गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

अमेरिकेत गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनीच अमेरिकेतील कॅलिफोर्नियात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज जगभरात राष्ट्रपित्याला अभिवादन सुरू असताना कॅलिफोर्नियातील एका बागेमध्ये बसवण्यात आलेल्या गांधीजींच्या सहा फुटी पुतळ्याची काही अज्ञातांनी विटंबना केली आहे. या घटनेनंतर अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी या प्रकाराची कडक शब्दांत निंदा केली असून द्वेष भावनेने करण्यात आलेल्या या गुन्ह्याची स्थानिक प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ब्रॉन्झ धातूमध्ये बनवलेल्या गांधीजींच्या या सहा फुटी पुतळ्याचे वजन ६५० पौंड आहे. उत्तर कॅलिफोर्निया राज्यातील दाविस शहरातील सेंट्रल पार्कमध्ये तो बसवण्यात आला होता. अज्ञातांनी या पुतळ्याची तोडफोड केली असून २७ जानेवारी रोजी तो सकाळी जमिनीवर तुटलेल्या अवस्थेत पडलेला पार्कच्या एका कर्मचाऱ्याच्या आढळून आला. यानंतर एका स्थानिक वृत्तपत्राने याची नोंद घेतली. या माध्यमातून सर्व माहिती भारतीय माध्यमांमध्ये पसरली.

अखेर सर्व प्रकारानंतर आता मोडतोड झालेला पुतळा संबंधित ठिकाणाहून हटवण्यात आला आहे. तसेच ही बाब आम्ही अत्यंत गंभीरपणे घेतली असल्याचे डेव्हिसच्या पोलीस विभागाचे उपप्रमुख पॉल डॉरोशोव्ह यांनी सांगितलं आहे.

महात्मा गांधींचा हा पुतळा भारत सरकारने दाविस शहराला भेट दिला होता. स्थानिक महापालिकेने तो चार वर्षांपूर्वी येथील सेन्ट्रल पार्कमध्ये बसवला होता. त्यानंतर आज गांधीजींच्या स्मृतीदिनीच पुतळ्याची विटंबना झाल्याची छायाचित्र माध्यमांवर प्रसिद्ध झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com