Galwan Clash : गलवान खोऱ्यात सैनिक गमावले; चीनने पहिल्यांदाच केलं मान्य
गेल्या वर्षी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतासोबत झालेल्या हिंसक झटापटीत चीनचे पाच सैन्य अधिकारी आणि जवानांचा मृत्यू झाला होता, अशी कबुली 'पीपल्स लिबरेशन आर्मी'नं (PLA) शुक्रवारी पहिल्यांदाच अधिकृतरित्या दिलीय.
कोरोनाच्या संकटानं मगरमिठी मारलेली असतानाच पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत व चिनी सैन्यामध्ये रक्तरंजित संघर्ष उफाळून आला होता. १५ जून २०२० रोजी मध्यरात्री हा लष्करी संघर्ष झाला होता. या घटनेत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्याचबरोबर गलवान व्हॅलीतील संघर्षानं भारत-चीन सीमेवर युद्धसदृश्य स्थितीही निर्माण झाली होती.
चीनी सेनेचं अधिकृत वर्तमानपत्र 'पीएलए डेली'नं शुक्रवारी दिलेल्या एका बातमीनुसार, 'सेंट्रल मिलिटरी कमिशन ऑफ चायना'नं (CMC) काराकोरम रांगेत तैनात असलेल्या आणि जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारताविरुद्ध झालेल्या संघर्षात प्राण गमावलेल्या आपल्या पाच सैन्य अधिकारी-जवानांना श्रद्धांजली वाहिली'.