गडकरी पक्ष नव्हे, विकासकाम बघतात; शरद पवारांनी केले नितीन गडकरींचे कौतुक

गडकरी पक्ष नव्हे, विकासकाम बघतात; शरद पवारांनी केले नितीन गडकरींचे कौतुक

Published by :
Published on

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज शनिवारी नगरमधील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले आहेत. पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये गडकरी यांनी मोठ्या प्रकल्पांचा धडाका लावला आहे. बारामती मतदारसंघातील अनेक प्रकल्प जोरदारपणे सुरू आहेत. पालखी मार्ग, पुरंदर विमानतळ, पुण्याचा रिंग रोड या प्रकल्पांनी गती घेतली आहे. वेगाने काम करण्यासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी ओळखले जातात. सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून गडकरींचे नेहमीच कौतुक होत असते.

नगरमध्ये आज एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांच्या कामगिरीचा उल्लेख करताना आलेला अनुभव देखील त्यांनी उपस्थितांना सांगितला आहे. गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी नमूद केले. नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले आहेत. यावेळी पवारांनी आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत असल्याचे सांगितले. "देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावे लागते. गाडीनं प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातलं पीक बघायला मिळते. म्हणून मी शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो",असे ते म्हणाले.

नितीन गडकरी आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात असे शरद पवार म्हणतात. "संसदेत मी बघतो की गडकरींकडे येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष ते बघत नाहीत तर त्याने आणलेले विकासकाम काय आहे हे ते पाहतात. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो", असे शरद पवार यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com