‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळे निधन!
भारताचे महान माजी धावपटू आणि 'फ्लाईंग सिख' अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत. त्यांनी देशाच्या असंख्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं हे फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 मे रोजी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मिल्खा सिंग यांच्या शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना पीजीआयएमआर नेहरु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.