First Transgender Cafe : मुंबईतील वर्सोवात उघडला तृतीयपंथींचा कॅफे
तृतीयपंथी समुदायातील लोकांना समाजात वावरताना प्रत्येक गोष्टीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या समाजात आजही तृतीयपंथी समुदायातील लोकांना मुलभूत गरजांसाठी झगडावं लागतं. काम मिळत नसल्याने अनेक तृतीयपंथी आपल्याला रस्त्यावर पैसे मागताना दिसतात. मात्र आता मुंबईतील तृतीयपंथी समाजातील एका व्यक्तीने सर्व बंधनं झुगारत कॅफे (Bambai Nazariya cafe) सुरु केला आहे.
मुंबईतील अंधेरी परिसरात उघडलेला हा कॅफे पहिला तृतीयपंथींनी (First Transgender Cafe) सुरु केलेला कॅफे आहे. अंधेरीतील वर्सोवामध्ये हा कॅफे सुरु करण्यात आला आहे. या कॅफेत काम करणारे कामगार देखील तृतीयपंथी आहेत. या कॅफेबद्दल बोलताना ते सांगतात की, 'आमच्या बॉसच्या वडिलांचं LGBTQI+ समुदायासाठी काहीतरी करण्याचं स्वप्न होतं. आमच्या समुदायासाठी नोकऱ्या मिळणं खूप अवघड आहे. आमच्या फक्त मुलाखती घेतल्या जातात.
'पिंक चाय' साठी प्रसिद्ध असलेल्या वर्सोव्याच्या बांबई नाझरिया कॅफेमध्ये फक्त तृतीयपंथी समुदायाचे सदस्य काम करतात. आपल्या बॉसचं आभार मानताना कामगाराने सांगितलं की, या संधीसाठी आम्ही आमच्या बॉसचे खूप आभारी आहोत. यापूर्वी मला नोकरी शोधण्यात खूप समस्या आल्या. त्यामुळे अशा प्रयत्नांना जास्तीत जास्त समर्थन दिलं पाहिजे.