Farmers Protest | शेतकरी आंदोलनाचा आज 100 वा दिवस, आंदोलन सुरुच राहणार

Farmers Protest | शेतकरी आंदोलनाचा आज 100 वा दिवस, आंदोलन सुरुच राहणार

Published by :
Published on

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 100 वा दिवस आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी जोपर्यंत सरकारन नवीन कायदे मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील असं सांगितलं आहे. शेतकऱ्यांची या विषयावर सरकारशी चर्चा करण्याची तयारी आहे. तसेच हे आंदोलन दीर्घ काळापर्यंत सुरु ठेवण्याचीही तयारी आहे असंही राकेश टिकेत म्हणाले. तसेच शेतकरी आंदोलनाचे #FarmersProtest100Days ट्रेंडीग देखील सुरु आहे.

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी गेल्या 100 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या आधी शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये या कायद्यांवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत पण कोणताही तोडगा निघाला नाही. सध्या सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा होत नाही. तसेच दिल्ली आंदोलनाच्या दरम्यान 500 हून अधिक पोलिस जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यूही झाला होता.

केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे हे देशातील शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणतील असं केंद्र सरकारचं मत आहे. संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण शेतकऱ्यांशी चर्चेसाठी केव्हांही तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. शेतकरी आंदोलनाच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हजारो लोकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून हिंसाचार घडवला होता. त्यावेळी या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्येही झडप झाल्याचं पहायला मिळालं होतं. काही आंदोलकांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रवेश करुन त्या ठिकाणी शीख धर्माचा ध्वजही फडकवला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com