Vinod Khanna Birthday: आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारे विनोद खन्ना खलनायक ते नायक, आगळा प्रवास

Vinod Khanna Birthday: आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारे विनोद खन्ना खलनायक ते नायक, आगळा प्रवास

अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जात असत.
Published by :
Team Lokshahi
Published on

अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जात असत. खलनायकाची भूमिका असो किंवा नायक किंवा कोणतेही इतर पात्र, विनोद खन्ना यांनी प्रत्येक पात्र पडद्यावर जिवंत केले आहे. आजही विनोद खन्ना त्यांच्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनामध्ये जिवंत आहेत.

आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी चित्रपट जगतातून निवृत्ती घेतली होती आणि ओशो रजनीश यांचे भक्त बनले होते. त्याच वेळी शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन देखील आपल्या कारकिर्दीच्या उंचीवर चढत होते. म्हणूनच अनेकांचे असे म्हणणे आहे की, जर त्या वेळी विनोद खन्ना यांनी माघार घेतली नसती, तर त्या काळात अमिताभ यांना जे यश मिळाले ते विनोदच्या वाट्याला आले असते.

विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद खन्ना आणि आईचे नाव कमला होते. त्याच्या वडिलांचा कापड आणि रसायनाचा व्यवसाय होता. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांचे कुटुंब पाकिस्तान सोडून भारतात आले.

विनोद खन्ना यांचे सुरुवातीचे शिक्षण क्वीन मेरी स्कूल, मुंबई येथे झाले. यानंतर, जेव्हा त्यांचे कुटुंब 1957 मध्ये दिल्लीला गेले, तेव्हा त्यांनी दिल्ली पब्लिक स्कूल, मथुरा रोड येथे शिक्षण घेतले. यावेळी त्यांनी मुघल-ए-आझम चित्रपट पाहिला आणि त्यांन मनोरंजन विश्वाची ओढ लागली. त्यांनी सिडनहॅम महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केली.

1968 मध्ये विनोद खन्ना यांनी सुनील दत्तच्या ‘मन का मीत’ चित्रपटात पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर प्रवेश केला. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. त्यांनी ‘मेरा गाव मेरा देश’, ‘रामपूर का लक्ष्मण’ आणि ‘आन मिलो सजना’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या नकारात्मक पात्राने लोकांचे मनोरंजन केले. त्या वेळी विनोद खन्ना यांना खलनायकी वेषात पाहण्याचा एक वेगळाच आनंद होता. 1970 मध्ये, विनोद खन्ना मनोज कुमार यांच्या ‘पूरब और पश्चिम’ या सुपरहिट चित्रपटातही दिसले होते.

यानंतर, त्यांनी ‘इंकार’, ‘आप की खातीर’, ‘परवरीश’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘खून पसीना’, ‘मुकद्दर का सिकंदर’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. 1980 मध्ये त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट रिलीज झाला, ज्याचे नाव होते ‘कुर्बानी’, ज्यामुळे ते तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com