’मेरा रंग दे बसंती..'चे गायक भुपिंदर सिंह यांचे निधन
मुंबई : सुरेल गळा लाभलेले गायक, गझलकार भूपिंदर सिंह (Bhupinder Singh) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी मिताली सिंगने यांनी ही माहिती दिली आहे
भूपिंदर सिंह मागील अनेक दिवसांपासून आजारी असून मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याची पत्नी मिताली सिंगने म्हणाल्या की, त्यांना काही काळापासून लघवीच्या समस्यांसह अनेक आरोग्यविषयक समस्यांचा त्रास होत होता. सोमवारी हार्टअटॅकने त्यांचे निधन झाले. भूपिंदर सिंह यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्रध्दांजली वाहिली आहे,
भूपिंदर सिंह यांनी हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रातील तीन दशक आपल्या सुरेल आवाजाने गाजवली आहेत. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है, दिल धुंडता है, नाम गुम जायेगा, एक अकेला इस शहर मे, जिंदगी मेरे घर आना ते अगदी अलिकडे सत्या चित्रपटातील बादलों को काट काट कर या गाण्यापर्यंत त्यांच्या आवाजातील गाणी अजूनही रसिकांच्या मनात घर करून आहेत.
भूपिंदर सिंग यांनी मौसम, सत्ता पे सत्ता, आहिस्ता आहिस्ता, दूरियां आणि हकीकत या अनेक चित्रपटातीली गाण्यांना आपला आवाज दिला आहे. ’मेरा रंग दे बसंती चोला’, ‘प्यार हमें मोड़ पर ले गया’, ‘हुजूर इस कादर’, ‘एक अकेला इस शहर में’, ‘जिंदगी मिलके बिताएंगे’, ‘बीटी ना बिताये रैना’ ही त्यांची विशेष गाजलेली गाणी आहेत.