Ved Movie Review : प्रेमातील वेडेपण अधोरेखित करणारा चित्रपट
पंकज राणे : प्रेमात वेडं होणं किंवा वेड्यासारखं प्रेम करणं ही भावना वेगळीच आहे. त्यात हे चित्रपटरूपात एका हटके कथेतून पाहणं एक वेगळं अनुभव देणारं ठरतं. असाच अनुभव देतोय वेड हा चित्रपट. मजीली या तेलुगू चित्रपटपासून प्रेरित हा चित्रपट आहे. अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय. पत्नी जिनीलिया पहील्यांदाच मराठीत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतेय. तर तिने निर्मतीची धुरा देखील सांभाळली आहे. या चित्रपटाचा आकर्षणाचा भाग म्हणजे रितेश आणि जिनीलिया या खऱ्या आयुष्यातील जोडीला स्क्रीनवर एकत्र पाहणं.
अलिबाग येथे वास्तव्यास असलेल्या क्रिकेटवेड्या तरुणाची ही कहाणी आहे. सत्या, हा क्रिकेटवर नितांत प्रेम करतो. सत्या आणि त्याच्या वडिलांचं छोटंसं कुटुंब आहे. याच सत्याच्या आयुष्यात निशा येते. निषासोबत मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं मात्र सत्यासाठी हे प्रेम वेड बनून जात. मात्र असं काही घडत ज्यामुळे सत्या आणि निशामध्ये दुरावा येतो. यात सत्या पुरता खचून जातो आणि दारूच्या आहारी जातो. या सगळ्यात त्याच्या कायम सोबत असते ती श्रावणी. श्रावणी ही सत्यावर वेड्यासारखं प्रेम करते. या सगळ्यात कुणाचं प्रेम जिंकत ? कुणाला त्यांचं प्रेम मिळत ? हा सगळं प्रवास वेड या चित्रपटात पाहायला मिळतोय.
अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटात सत्याची भूमिका साकारतोय. एकीकडे दिग्दर्शन तर दुसरीकडे अभिनय या दोन्ही बाजू त्याने उत्तम सांभाळल्यात. शिवाय प्रत्येक कलाकाराकडून योग्य काम काढून घेण्याचं काम चोख पार पाडलय. शिवाय या कथेचं छान सादरीकरण करण्यात आलंय. एकीकडे क्रिकेटप्रेमी सत्या तर दुसरीकडे प्रेमातील वेडेपण या दोन्ही बाजूंचा समतोल त्याने राखलाय. शिवाय आपल्याला कायम बबली अंदाजात दिसलेली जिनीलियाला वेगळ्या रूपात आणण्याचा प्रयत्न रितेशने केलाय. जिनीलिया या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठीत महत्त्वाची भूमिका साकारतेय. श्रावणी हे पात्र ती साकारतेय. अगदी पहिल्या फ्रेमपासून ती लक्ष वेधून घेतेय. श्रावणीचा निस्वार्थी स्वभाव किंवा सत्याच्या प्रेमातील वेडेपण तिने उत्तम सादर केलंय. मराठीत पहील्यांदाच काम करत असल्यामुळे काही उच्चार वगळता श्रवणीच्या भूमिकेतील हावभावातून तिने छान सादरीकरण केलय. प्रत्येक सीनमध्ये ती लक्ष वेधून घेते.
अभिनेत्री जिया शंकरचं या चित्रपटातून मराठीत पदार्पण आहे. निशाच्या भूमिकेत ती भाव खाऊन जाते. तर जोंटीच्या भूमिकेत अभिनेता शुभंकर तावडेने उत्तम काम केलंय. तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सत्याच्या वडिलांची भूमिका साकारतायात. त्यांच्याविषयी जितकं लिहावं तितकं कमीच. विनोदाचं अचूक टायमिंग, संवाद कौशल्य, अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांचं पात्र लक्ष वेधून घेतं. तर अभिनेते विद्याधर जोशी यांचेही विनोदी सीन लक्षवेधी ठरतात. अभिनेता रविराज केंडेने देखील भास्कर ही नकारात्मक भूमिका छान खुलवलिये. खुशी हजारे ही बालकलाकार देखील लक्ष वेधून घेतेय. तर विनीत शर्मा, अविनाश खेडेकर, विक्रम गायकवाड यांची उत्तम साथ लाभली आहे.
या चित्रपटाचं संगीत, गाणी आणि त्यांचं छायांकन जमेची बाजू आहे. अजय - अतुल यांचं अप्रतिम संगीत चित्रपटाच्या कथेला न्याय देत. बेसुरी, वेड तुझा ही गाणी विशेष लक्ष वेधून घेतात. भुषणकुमार जैन यांचं छायांकन कथेला साजेस आहे. तर हृषिकेश दुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांची पटकथा तर प्राजक्त देशमुख यांचे संवाद आहेत. या चित्रपटात काही गोष्टी खटकतात. चित्रपटाचा पूर्वार्ध जलद गतीने पुढे जातो. तर उत्तरार्ध धीम्या गतीने मूळ कथा समोर आणतो. काही महत्त्वाच्या सीनमध्ये संवाद खुलवण्यात वाव असल्याचं जाणवतं. रितेश देशमुखचा काही ठिकाणी संवादा पुरता अभिनय खटकतो. तर भाषेच्या बंधनामुळे महत्त्वाचे सीन खुलवण्यात जिनीलियाला अपयश आलंय. असं असलं तरी ही प्रेमात वेडी असलेली सत्या, निशा, श्रावणी ही पात्र मनं जिंकून घेतात. त्यामुळे हटके कथेमुळे हा चित्रपट लक्ष वेधून घेतो.
रेटिंग - 3.5 स्टार्स