Sushant Singh Rajput : 'ही' मालिका ठरली सुशांतसाठी टर्निंग पॉईंट...
14 जून ही मनोरंजन विश्वासाठी एका वाईट तारखेपेक्षा कमी नव्हती. या दिवशी सोशल मीडियावर एक बातमी आली की सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. अशावेळी सर्वांनाच अगदी धक्का बसला होता. अनेकांच्या डोळ्यात ओलावा निर्माण झाला होता. आतापर्यंत सुशांतच्या चाहत्यांना या बातमीतून सावरणे देखील कठीण झाले आहे. सुशांत सिंग राजपूतची गणना बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. 2008 मध्ये या अभिनेत्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. दोन टीव्ही मालिका आणि 12 चित्रपटांमध्ये काम करून या अभिनेत्याने फार कमी वेळात यशाचा मार्ग मोजला होता. आज सुशांतची पुण्यतिथी आहे. जाणून घेऊया आपण सुशांतच्या कारकिर्दीबद्दल.
सुशांत सिंग राजपूतने 2008 मध्ये 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेतून पदार्पण केले होते. या शोमध्ये त्याने प्रीत जुनेजा ही भूमिका साकारली होती. या शोमध्ये सुशांत मुख्य भूमिकेत दिसला नसला तरी त्याला बऱ्याच प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर सुशांत सिंग राजपूतने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. मानव देशमुखच्या भूमिकेत तो लोकांना खूप आवडला. या शोमध्ये सुशांतसोबत अंकिता लोखंडे दिसली होती. पवित्र रिश्ता शो घरोघरी लोकप्रिय झाला. सुशांत आणि अंकिताची निरागस प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूप आवडली. हा सुशांतच्या करिअरचा टर्निंग पॉइंट होता. या शोने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.