सामान्य गृहिणीच्या संघर्षाचा प्रवास घडविणारा 'हवाहवाई' चित्रपटाचा ट्रेलर लाँच
मागील काही दिवसांपासून हटके टायटल असलेल्या 'हवाहवाई' या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. "द ग्रेट इंडियन किचन" या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा सजयनचं मराठीत पदार्पण होत असून आज या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी "हवाहवाई" चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश टिळेकर यांनी आतापर्यंत वन रूम किचन, गाव तसं चांगलं यासारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले असल्याने "हवाहवाई" त्याच मांदियाळीतला आहे.
'हवाहवाई'च्या ट्रेलर मधून हा चित्रपट एका मध्यमवर्गीय गृहिणीची संघर्षमय कथा असल्याचे दिसते. आयुष्यात चैनीत राहता आलं नाही तरी चालेल पण सुखाने जगता आलं पाहिजे ही भावना चित्रपटाची नायिका ज्योती हीची आहे. आयुष्यात आलेल्या एका संकटामुळे ज्योती घरसंसार सांभाळून फूडस्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेते, असे ट्रेलर मध्ये दिसते. सामान्य गृहिणी असलेल्या ज्योतीच्या ध्येयपूर्तीचा प्रवास नेमका कोणत्या वळणावर जातो हे बघणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे.
'हवाहवाई' चित्रपटात अभिनेत्री निमिषा सजयन सोबतच अभिनेत्री वर्षा उसगावकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे,विजय आंदळकर, अंकित मोहन या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका हवाहवाई चित्रपटात साकारल्या आहेत.
'हवाहवाई' चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले, यांनी वयाच्या ८८व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं गायलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या ठसकेबाज आवाजातही एक उत्तम गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून चित्रपटातील गीते महेश टिळेकर यांनी लिहिली आहेत. कला दिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता म्हणून अभिजित अभिनकर यांनी काम पाहिले असून नृत्य दिग्दर्शन सॅन्डी संदेश यांचे आहे.
एका मध्यमवर्गीय गृहिणीचा स्वप्नपूर्तीकडे होणार संघर्षमय प्रवास दाखवणारा 'हवाहवाई' येत्या ७ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.